छत्रपती संभाजीनगर : फेसबुकवर भेटलेल्या भामट्याने विदेशातून गिफ्ट पाठविल्याची थाप मारून साथीदारांच्या मदतीने शहरातील महिलेस २१ लाख ५० हजार रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला होता. तीन वर्षांपूर्वीच्या या गुन्ह्यात ज्याच्या खात्यात ही रक्कम जमा झाली त्या आरोपीविरोधात पीडितेने सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन त्याचा जामीन रद्द करण्याचे आदेश मिळविले. आदेशानुसार तो पोलिसांसमोर हजर न झाल्याने न्यायालयाने काढलेल्या अटक वॉरंटची अंमलबजावणी पोलिसच सहा महिन्यांपासून करत नसल्याची बाब समोर आली.
सन २०२० मध्ये झालेल्या २१ लाख ५० हजार रुपयांच्या या ऑनलाइन फसवणूकप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. तपास अधिकारी या गुन्ह्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याच्या तक्रारीनंतर तत्कालीन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी या गुन्ह्याचा तपास सायबर पोलिसांकडे वर्ग केला होता. सायबर पोलिसांनी तपास करून ज्या बँक खात्यात ही रक्कम जमा झाली त्या ब्रिजेश इंद्रमणी शुक्ला आणि अन्य एका आरोपीला अटक केली होती. पण, त्यांच्याकडून एक रुपयाही जप्त केला नाही. न्यायालयीन कोठडीत असताना दोन्ही आरोपींनी एकापाठोपाठ ट्रायल कोर्टाकडून जामीन मिळविला.
ही बाब पीडितेला समजताच तिने आरोपी ब्रिजेशचा जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांकडे पाठपुरावा केला, मात्र पोलिसांनी तिला साथ दिली नाही. शेवटी तिने स्वखर्चाने वकील लावून आरोपीचा जामीन रद्द करण्यासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्याचा जामीन रद्द केला. आरोपीने खंडपीठात अपील दाखल केले. खंडपीठाने त्याला जामीन नाकारल्याने आरोपीने सर्वोच्च न्यायालयात अपील केले. सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिन्यात त्याचे अपील फेटाळत ट्रायल कोर्टासमोर हजर होण्याचे आदेश दिले. आरोपी हजर न होता फरार झाल्याने पीडितेने पुन्हा न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले. या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, यासाठी पीडिता सहा महिन्यांपासून पोलिस ठाण्याच्या खेट्या मारत आहे.
सायबर भामटा अजूनही देतोय त्राससायबर भामटा अजूनही करतोय तिला मेसेज अन् कॉल पीडितेसोबत मैत्री करून साथीदारांच्या मदतीने २१लाख ५० हजारांचा ऑनलाइन गंडा घालणारा फेसबुक फ्रेंड आजही त्याच मोबाइल नंबरवरून पीडितेला मेसेज करून पैशाची मागणी करीत असतो. ही बाब तिने अनेकदा सायबर पोलिसांना कळविली, मात्र त्यावरही पोलिसांनी चुप्पीच साधली, असे फिर्यादी महिलेने सांगितले.