कुरूंदा : वसमत तालुक्यातील भेंडेगाव येथील एका शेतकऱ्याच्या आखाड्यावरून लालकंधारी बैलजोडीची चोरी करणाऱ्या दोनजणांना कुरूंदा पोलिसांनी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथून अटक केली आहे. पोलिसांनी आरोपींकडून एक वाहनही जप्त केले आहे.भेंडेगाव येथील शेतकरी अंकुश सोनटक्के यांच्या आखाडयावरून अज्ञात चोरटयांनी २८ एप्रिल रोजी ८५ हजार रूपये किंमतीची लालकंधारी बैलजोडी पळविली. या प्रकरणी अज्ञात चोरटयांविरूद्ध कुरूंदा ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यानंतर चोरलेली बैलजोडी पुसद तालुक्यातील बाजारात विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यानंतर कुरूंदा ठाण्याचे जमादार भगवान वडकिल्ले, सोनुने यांनी पुसद पोलिसांची मदत घेवून बाजारातून चोरी झालेली बैलजोडी, वाहन व आरोपी वाहनचालक शेख मन्नतू शेख लतीफ, शेख बशीर शेख छोटू या दोघांना ताब्यात घेतले आहे.कुरूंदा पोलिसांनी तत्परता दाखविली. त्यामुळे चोरी गेलेली बैलजोडी ४८ तासात परत शेतकऱ्याला मिळाली. तर जेरबंद केलेल्या आरोपींंकडून गुरांच्या चोरीचे इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस वर्तवत आहेत. (वार्ताहर)
बैलजोडी चोरटे अखेर पोलिसांच्या जाळ्यात
By admin | Published: May 03, 2016 12:58 AM