वाळूज महानगर : बजाजनगरातून सव्वादोन लाखाचे २२ मोबाईल व रोख २० हजार रुपये लांबविणाऱ्या मोबाईल स्टोअरच्या व्यवस्थापकाविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
तेलंगणा राज्यातील सिलेक्ट गॅझेट एलएलपी या कंपनीच्या वतीने विविध कंपन्यांचे मोबाईल विक्री करण्यात येतात. मोबाईल विक्री करण्यासाठी कंपनीने औरंगाबादसह राज्यात ११ ठिकाणी स्टोअर सुरू केले. प्रत्येक महिन्यात कंपनीच्या अधिकाऱ्याकडून या स्टोअरला भेटी देऊन मोबाईलचा स्टॉक व ऑडिट रिपोर्ट कंपनीच्या माधापुरा येथील मुख्य कार्यालयात पाठविण्यात येतो. या कंपनीत ऑडिट व्यवस्थापक म्हणून काम करणारे नागराज लोकनाथन (रा. वरकोंडा, सिकंदराबाद) हे सोमवारी (दि.२३) बजाजनगरातील रिटेल शॉपीच्या ऑडिटसाठी आले होते. ऑडिट करताना नागराज यांना विविध नामांकित कंपन्यांचे महागडे २२ मोबाईल गायब असल्याचे दिसून आले. नागराज यांनी कॅशिअर सुलतान देशमुख यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी ते मोबाईल स्टोअरचे व्यवस्थापक अस्कर अली मिर्झा अख्तर अली बेग यांनी बिले तयार न करता नेल्याचे सांगितले, तसेच अस्कर अली यांनी मोबाईल विक्रीतून जमा झालेले २० हजार रुपयेही कंपनीच्या खात्यावर जमा केले नसल्याचे तपासणीत दिसून आले. नागराज लोकनाथन यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून व्यवस्थापक अस्कर अलीविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक राजेंद्र बांगर तपास करीत आहेत.
----------------------