वाळूज महानगर : बजाजनगरात शेजाऱ्याशी झालेल्या वादातून दोन्ही मुलांना इमारतीवरून खाली फेकत स्वत:खाली उडून मारून आत्महत्येचा प्रयत्न करणारी आई अनिता अतकर व तिची तीन वर्षीय मुलगी प्रतीक्षा या दोघी बचावल्या होत्या. या मायलेकींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून, या घटनेत मयत झालेल्या सोहमचा मंगळवारी शहरातील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आला.
बजाजनगरातील अनिता आतकर यांचा लहान मुलांच्या खेळण्यावरून सोमवारी शेजाऱ्याशी वाद झाला होता. या वादातून संतप्त झालेल्या अनिता यांनी मुलगा सोहम (१) व मुलगी प्रतीक्षा (३) यांना २.३० वाजेच्या सुमारास दुमजली इमारतीच्या छतावर जमिनीवर फेकून दिल्यानंतर स्वत: उडी मारली होती. या घटनेत सोहमचा जागेवरच मृत्यू झाला, तर अनिता व प्रतीक्षा आतकर गंभीर जखमी झाल्या होत्या. या खळबळजनक घटनेनंतर पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांनी गंभीर जखमी मायलेकी व सोहम यास शासकीय रुग्णालयात रवाना केले होते. दरम्यान, या घटनेत अनिता यांचे दोन्ही पाय तुटले असून, दातेही पडली आहेत, तर प्रतीक्षाच्या मांडीला फ्रॅक्चर झाले आहे. केवळ नशीब बलवत्तर म्हणून उंचावरून पडूनही या मायलेकी बचावल्या असून, त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान, जखमी अनिता आतकर या जबाब देण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांचा जबाब पोलिसांना नोंदविता आला नाही. अधिक तपास सहायक निरीक्षक घुणावत हे करीत आहेत.
दरम्यान, सोहमवर शहरातील स्मशानभूमीत मंगळवारी मोजक्याच नातेवाईकांच्या उपस्थितीत अंत्यविधी करण्यात आला. आतकर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती जेमतेम असल्याने माणुसकी फाउंडेशनचे सुमित पंडित व त्यांच्या सहकाऱ्यांनी या कुटुंबाला उपचारासाठी आार्थिक मदत केली. याचबरोबर सोहमवर अंत्यविधीसाठी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला होता.
----------------------