औरंगाबाद: अभिनेता शाहरुख खानचा बहुचर्चित पठाण हा चित्रपट आज प्रदर्शित झाला असून प्रदर्शन पूर्व तिकीट विक्रीचा विक्रम चित्रपटाने केला आहे. ट्रेलर प्रदर्शनापासून चित्रपटाला काहींनी हिंदू विरोधी असल्याचे म्हणत विरोध केला होता. दरम्यान, आज चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर औरंगाबादेत बजरंग दलाने सिडकोतील एका चित्रपट गृहाबाहेर निदर्शने करत पोस्टर फाडले.
गेल्या काही दिवसांत पठाण चित्रपटावरून मोठा वांदंग सुरूय. आधी बेशरम रंग या गाण्यातील भगव्या रंगाची बिकिनी आणि गाण्याचे बोल यावर आक्षेप नोंदवला गेला होता. त्यानंतर सेन्सॉर बोर्डाने काही बदल सुचवले होते. आज हा चित्रपट प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांचा उत्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाने प्रदर्शनपूर्व तिकीट विक्रीचा विक्रम केल्याने विरोध मावळला असल्याचे चित्र दिसत होते. मात्र, अचानक काही ठिकाणी चित्रपटास विरोध सुरु झाला. औरंगाबादेतही सिडको येथील एका मल्टीप्लेक्ससमोर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने सुरु केली. चित्रपटाचे पोस्टर देखील कार्यकर्त्यांनी फाडले. अभिनेता शाहरुख खान, पठाण चित्रपट हिंदू विरोधी असल्याचा आरोप करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी लागलीच परिस्थिती आटोक्यात आणली.
धुळ्यात थेटअरटरमध्ये घुसून फाडले पोस्टर्स धुळे शहरात बजरंग दल आणि हिंदुत्त्ववादी संघटनांकडून जोरदार निदर्शने केली जात आहेत. बजरंग दलाने धुळे शहरातील दोन चित्रपटगृहाबाहेर आंदोलन केले. मल्टिप्लेक्स आणि थिएटरमध्ये पठाण चित्रपट चालू न देण्याची धमकी दिली. शहरातील ॲडलब चित्रपटगृहात आज बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पठाण चित्रपटाचा निषेध करत पोस्टर फाडले. यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. चित्रपट उशिराने सुरू झाल्यानंतर चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं.