वाळूज महानगर : बजाजनगरातील श्री साई मंदिर परिसरात बांधलेल्या भिंतीवरून रविवारी दोन गटांत वाद होऊन तुफान दगडफेक झाली. यात जवळपास १२ जण जखमी झाले असून, वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. याप्रकरणी दोन्ही गटाकडून पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार देण्यात आली आहे.
सिडको अधिसूचित क्षेत्रातील गट नंबर ४८ वरील मोकळी जागा अनेक वर्षांपासून श्री साई मंदिर संस्थानच्या ताब्यात आहे. परंतु काही दिवसांपूर्वी येथील सोसायटीच्या नागरिकांनी त्यावर भिंत बांधली आहे. त्यामुळे या भिंतीवरून साई मंदिर संस्थान पदाधिकारी व सोसायटीतील नागरिकांमध्ये वाद सुरू आहे. दरम्यान, येथील मंदिरातून शिर्डी साईबाबा देवस्थानच्या दिशेने पायी दिंडी जाणार आहे. रविवारी सकाळी साईबाबा पालखी दिंडीचे नियोजन करण्यासाठी मंदिरात बैठक घेण्यात आली.
या बैठकीत भिंत बांधल्याने मंदिरातून रथ घेऊन जाणे शक्य नसल्याने सदरील भिंत पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. दुपारी जेसीबीने भिंत तोडत असताना सोसायटीतील नागरिकांनी भिंत तोडण्यास विरोध केला. यावेळी दोन्ही गटांत शाब्दिक चकमक होऊन वादाला सुरुवात झाली.
वाद वाढल्याने दोन्ही गटांकडून दगडफेक करण्यात आली. यात जवळपास १२ महिला-पुरुष जखमी झाले आहेत. तसेच भिंत पाडण्यासाठी आणलेल्या जेसीबीसह मंदिर परिसरात उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फुटल्याने वाहनधारकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी मध्यस्थी करून दोन्ही गटांतील वाद मिटविला. दोन्ही गटांतील नागरिकांनी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रार दिली आहे. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
१० ते १२ जण जखमीदोन्ही गटांकडून झालेल्या दगडफेकीत शैलजा लाड, कल्याण आरगडे, मंदा सपकाळ, वंदना पोपळघट, लक्ष्मी तायडे, स्मिता लांडे, कृष्णा बगाडे, जेसीबी चालक (नाव समजू शकले नाही) आदींसह जवळपास १० ते १२ जण जखमी झाले आहेत. यात मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या शैलजा लाड यांचा पाय फॅ्रक्चर झाला आहे.