संजय कुलकर्णी/गजेंद्र देशमुख , जालनापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाचा सर्वदूर मोठा बोलबाला होत असताना त्यास छेद देणारे विदारक चित्र या जिल्ह्यात प्रकर्षाने जाणवत आहे. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे येथील जिल्हा स्थानचे बकाल बसस्थानक़मराठवाडा आणि विदर्भाची सीमा असल्याने दररोज हजारोंच्या घरात प्रवाशांची वर्दळ असलेला बसस्थानक परिसर. लांबपल्ल्याच्या प्रवाशांना अनेकदा बसच्या प्रतीक्षेत येथे रात्री-अपरात्री थांबावे लागते. परंतु त्या तुलनेत बसस्थानक सर्वात बकाल असल्याचे विदारक चित्र येथे पाहावयास मिळते. स्थानकातील परिसर नेहमी अस्वच्छ आणि दुर्गंधीमय असतो. त्याचा मोठा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. स्थानकात गेले की, नाकाला रूमाल लावून बसावे लागते. मोकाट जनावरे या आवारातच भटकंती करत असतात. पाण्याचे पाऊच, कचरा टाकण्यासाठी डस्बीन नावाचा प्रकार येथे पाहावयास मिळत नाही. त्यामुळे अनेकजण पाऊच आवारातच टाकतात. प्रवेशद्वारापासून स्थानकात कुठेही जा, दुर्गंधीचा वास सर्वत्र असतो. त्याचा परिणाम प्रवाशांच्या आरोग्यावर होत आहे. स्थानकाच्या आवारातील रस्ते उखडले असून आदळाआपट करूनच बस स्थानकाबाहेर निघते. गेल्या अनेक दिवसांपासून अंतर्गत रस्त्यांची अशी अवस्था आहे. परंतु एस.टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानकातील स्वच्छतेविषयक विविध अडचणींसंदर्भात आगारप्रमुख व्ही.एम. वाकोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्थानकातील सर्व अडचणी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. स्थानकात अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम लवकरच होणार आहे. परिसर स्वच्छतेचे कंत्राट ज्या एजन्सीकडे होते, त्यांचा कालावधी संपलेला आहे. स्वच्छतागृहांतील सफाईची आपण दररोज पाहणी करतो. तेथे फारशी असुविधा नाही, असा दावा करीत वाकोडे यांनी त्यासंदर्भातही आपण लक्ष देऊन उपाययोजना करू, असे सांगितले.
बकाल बसस्थानक
By admin | Published: November 10, 2014 11:38 PM