औरंगाबाद : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर जास्त प्रभाव राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला होता. त्यामुळे महापालिकेने गरवारे कंपनीच्या सहकार्याने त्यांच्याच परिसरात बाल कोविड सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला. १२५ बेडच्या सेंटरचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, ऑक्सिजनच्या लाइनचे काम पूर्ण झाले. प्लांट उभारणीचे काम बाकी आहे. बालकांच्या मनोरंजनासाठी आकर्षक चित्र, दोन एलसीडी, सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत, अशी माहिती मनपाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.
जळगाव रोडवरील गरवारे कंपनीच्या शेडमध्ये हे सेंटर उभारण्यात येत आहे. सीएसआर निधीतून हे सेंटर उभारले जात असून, नंतर ते महापालिकेच्या ताब्यात दिले जाणार आहे. ० ते १८ वयोगटातील मुलांवर उपचार केले जाणार आहेत. बालकांसोबत एका पालकाची राहण्याची व्यवस्था आहे. ० ते ६ महिने वयोगटातील बालकांसाठी काचेच्या स्वतंत्र दालनामध्ये व्यवस्था, ६ महिने ते ४ वर्षाच्या आतील बालकांसाठी दालन तयार केले आहे. ४ ते १० वयोगटातील बालकांसाठी स्वतंत्र आणि १० ते १८ वयोगटातील बालकांना ठेवण्यासाठी व्यवस्था केली आहे.
१३ केएलचा प्लांट
१२५ बेडला ऑक्सिजनचा पुरवठा करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र लाईन टाकण्यात आली आहे. तसेच ऑक्सिजन प्लांट उभारणीचे काम लवकरच हाती घेतले जाणार असून, या ठिकाणी १३ केएलचा लिक्विड ऑक्सिजन प्लांट उभारला जाणार आहे.
७२ जणांची नियुक्ती करणार
सेंटरमधील बालकांवर उपचार करण्यासाठी १२ डॉक्टर्स, ३० परिचारिका, ३० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. हे कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतील. डॉक्टर, कर्मचाऱ्यांना विश्रांती कक्षाची व्यवस्था आहे. त्यासोबतच औषधी व इतर साहित्य ठेवण्याकरिता स्वतंत्र खोली राहणार आहे.