चेतन धनुरे , लातूरलोकसभा निवडणुकीचा धुरळा अजून विसावतो न् विसावतो तोच विधानसभेची रणनीती आखणे सुरु झाले आहे़ अहमदपूर विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी संपर्क वाढविला आहे़ काँग्रेस व राष्ट्रवादीकडून आजघडीला तरी प्रत्येकी एकच नाव समोर आहे़ गत निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या भाजपाच्या आशा लोकसभेच्या निवडणुकीने पल्लवीत झाल्या आहेत़ येथून मोठी आघाडी भाजपाच्या उमेदवारास मिळाल्याने त्यांच्याकडून इच्छुकांची संख्याही वाढत चालली आहे़२००९ च्या विधासभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे बाबासाहेब पाटील (रिडालोस) आणि काँग्रेसचे विनायकराव जाधव यांच्यात काट्याची लढत झाली़ केवळ २ हजार २५२ मतांनी बाबासाहेब विजयी झाले होते़ तत्पूर्वीच्या निवडणुकीत आमदारकी पटकाविणारे भाजपाचे बब्रुवाहन खंदाडे मात्र यावेळी तिसऱ्या क्रमांकावर राहिले़ पक्षाकडून तिकिट न मिळाल्यास स्वतंत्र वाट धरणाचा शिरस्ता या मतदारसंघात कायम राहिला आहे़ याला विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील तसेच माजी आमदार विनायकराव जाधव हेही अपवाद नाहीत़ २००९ च्या निवडणुकीत आघाडीतून अहमदपूरची जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने राष्ट्रवादीत रमलेल्या बाबासाहेब पाटील यांनी रासपच्या माध्यमातून स्वतंत्र चूल मांडली़ तत्पूर्वी १९९९ मध्ये विनायकरावांनीही अपक्ष म्हणून लढत देत आमदारकी पटकाविली होती़ यावेळी हा मतदारसंघ आघाडी झाल्यास काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडे जाण्याची चर्चा जोर धरत आहे़ याच शब्दावर बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता़ त्यामुळे काँग्रेसच्या विनायकरावांची अडचण होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ परंतु, पूर्वेतिहास लक्षात घेता त्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी यावेळीही ठेवावी, असा आग्रह त्यांच्या समर्थकांनी धरला आहे़ त्यामुळेच मनसेने जर विनायकरावांची इच्छा असेल तर विधानसभेला त्यांच्यासाठी पायघड्या अंथरण्याची तयारी ठेवली आहे़ आजघडीला काँग्रेसकडून विनायकराव जाधव व राकाँकडून आमदार बाबासाहेब पाटील यांचीच नावे समोर आहेत़ दुसरीकडे भाजपाने लोकसभेत मोठी आघाडी या मतदारसंघातून मिळविल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे़ भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेश हाके पाटील यांची अंतर्गत तयारी सुरुच आहे़ माजी आमदार बब्रुवाहन खंदाडे यांनीही आपला मजबूत दावा कायम ठेवला आहे़ दरम्यान, जि़प़तील भाजपाचे गटनेते रामचंद्र तिरुके यांनीही या मतदारसंघातून लढण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत़
बालाघाट सर करण्या सरसावले इच्छुक...
By admin | Published: June 12, 2014 12:52 AM