औरंगाबाद : रोकडिया हनुमान कॉलनीत हजारो भाविकांच्या साक्षीने बालाजी भगवंत व पद्मावती देवीचा नेत्रदिपक विवाह सोहळा शनिवारी पार पडला. यावेळी ‘गोविंदा, गोविंदा वेंकटरमणा गोविंद’ असा गजराने परिसर दुमदुमला होता.
रोकडिया हनुमान मंदिर व पोवा बालाजी संस्थान ट्रस्टच्यावतीने भगवंतांच्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ढोलताशाचा निनादात बालाजी भगवंतांची शोभायात्रा काढण्यात आली होती. रस्तोरस्ती सडा टाकण्यात आला होता. रांगोळी काढण्यात आली होती. सजविलेल्या रथात बालाजी भगवंताची मूर्ती ठेवण्यात आली होती. जागोजागी भाविक भगवंताचे दर्शन घेत होते व पृष्पवृष्टी करण्यात येत होती. सायंकाळी भगवंताची शोभायात्रा रोकडा हनुमान कॉलनीत पोहोचली. ब्रह्मवृंदांनी बालाजीची मूर्ती हातात घेऊन विवाह मंडपात आणली. यानंतर देवी पद्मावतीची मूर्तीही विवाह मंडपात आणल्या गेली. यावेळी हजारो भाविक ‘गोविंदा, गोविंदा वेंकटरमणा गोविंदा’ असा गजर करीत होते. जयंतीलाल पटेल यांच्या हस्ते देवाच्या मूर्तीची नाणेतुला करण्यात आली.
विजय कुलकर्णी, राजेंद्र सुर्यवंशी व शेखर जोश्ी यांच्या हस्ते देवाच्या मूर्तीची शर्करातुला करण्यात आली. वर पिता म्हणून संतोष दंडारे तर वधू पिता म्हणून जगदीश हरसुलकर हे होते. ‘शुभमंगल सावधान’ असे म्हणत मंगलाष्टकाला सुरुवात झाली. कोणी अक्षता तर कोणी पुष्पवृष्टी करीत होते. बालाजी व पद्मावती भगवंतांचा विवाह झाला आणि सर्वांनी एकसाथ ‘गोविंदा, गोविंदा वेंकटरमणा गोविंदा,’ ‘ श्री बालाजी भगवंत की जय’ असा जयघोष करुन संपूर्ण परिसर दणाणून सोडला.
यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर भगवंतांच्या मूर्तीची विधवत मंदिरात स्थापना करण्यात आली. त्यानंतर हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सोहळा यशस्वीतेसाठी भानजीभाई पटेल, जितमल बगडिया, राजकुमार अग्रवाल, नरेश गुप्ता, सचिन सावजी, अॅड.रामकिशन बाहेती, जिवराजभाई पटेल, प्रदिप वाघ आदींनी परिश्रम घेतले. पौरिहित्य प्रविण कुलकणी व अरूण डावरे गुरुजी यांनी केले. पुढील वर्षी गरीबाचे लग्न लावणार पुढील वर्षी भगवान बालाजी व पद्मावती देवीच्या विवाह सोहळ्यात गरीब घरातील वधू-वराचे लग्न लावून देण्यात येणार आहे. सर्व खर्च रोकडिया हनुमान मंदिर व पोवा बालाजी संस्थान ट्रस्टतर्फे करण्यात येणार आहे, अशी घोषणा मंदिराचे विश्वस्त विनोद शेवतेकर यांनी केली. आणि उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.