छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागात घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाच्या कामांसाठी आचारसंहितेपूर्वी जिल्ह्यातील ६५६ गावांना कार्यारंभ आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यापैकी २२५ गावे कचरा विलगीकरणासाठी ‘सॅग्रीगेशन शेड’ उभारण्यास यशस्वी झाली आहेत. या कामासाठी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १५ गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात ६० लाखांचा निधी देण्यात आला. उर्वरित निधी ३१ मार्चच्या रात्रीच राज्यस्तरावरून गोठावण्यात आला. गोठावलेला हा निधी चालू आर्थिक वर्षात पुन्हा प्राप्त होईल, अशी अपेक्षा जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली.
चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात ११९७ गावांमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन यशस्वी करण्याचे धोरण मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी आखले होते. त्यानुसार स्वच्छ भारत मिशन कक्षाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांंना मिशन मोडवर ही कामे यशस्वी करून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. दरम्यान, ऑगस्ट २०२३ मध्ये राज्याच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाने घनकचरा व्यवस्थापनासाठी गावागावात ‘सॅग्रीगेशन शेड’ उभारून तिथे कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंच व संबंधित ग्रामसेवकांना ‘सॅग्रीगेशन शेड’साठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह धरला. यासाठी काही ठिकाणी विरोधही झाला. परंतु, अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून कचरा विलगीकरणाचे महत्त्व समजावून सांगितल्यानंतर विरोध मावळला. शासनाकडून ‘सॅग्रीगेशन शेड’साठी लोकसंख्येच्या प्रमाणात निधीही दिला जाणार आहे. सुरुवातीला ग्रामपंचायतींनी शेड उभारण्यासाठी १५ व्या वित्त आयोगातून खर्च करणे बंधनकारक आहे. शेडचे काम पूर्ण झाल्यानंतर स्वच्छ भारत मिशन कक्षाकडून निधी दिला जातो.
जिल्हा कक्ष हा केवळ मध्यस्थजिल्ह्यात आतापर्यंत २२५ शेड उभारण्यात आले असून यापैकी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील १५ कामांना प्रशासनाने ६० लाखांचा निधी वितरित केला आहे. या कामांसाठी ३ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. हा निधी राज्याच्या स्वच्छ भारत मिशन कक्षाकडून दिला जातो. ३१ मार्च रोजी शिल्लक निधी हा शून्य झाल्याचे ऑनलाईन दिसून आले. जिल्हा कक्ष हा मध्यस्थाचे काम करतो, असे जि. प. स्वच्छ भारत मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले यांनी सांगितले.