औरंगाबाद : ‘अध्यक्ष महोदय... माझे ऐका... मला बोलू द्या... काय बोलताय? एकू येत नाही... दादा... नाना... ताई... तुम्ही बोला.... अहो ऐका, विषय पत्रिकेवर बोला... विषय सर्वानुमते मंजूर...’ जशी या वाक्यांची कुठेच लिंक लागत नाही, तशाच तांत्रिक अडचणी, गोंगाट आणि गोंधळात शुक्रवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली. त्यात अर्थ समितीचे सभापती किशोर बलांडे यांनी २०२०-२१ चा सुधारित, तर २०२१-२२ चा मूळ अर्थसंकल्प मांडला.
कोरोनामुळे ऑनलाईन ठेवलेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत १५ हून अधिक पदाधिकारी, सदस्य जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात होते. अध्यक्षा मीना शेळके, उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, अर्थ व बांधकाम सभापती किशोर बलांडे, शिक्षण सभापती अविनाश गलांडे, समाजकल्याण सभापती मोनाली राठोड, महिला व बालकल्याण सभापती अनुराधा चव्हाण, सदस्य रमेश गायकवाड, केशवराव तायडे, गजानन राऊत हे अध्यक्षांच्या दालनात एकमेकांच्या मोबाईल, लॅपटाॅपवरून ऑनलाईन, तर यशवंतराव चव्हाण सभागृहातून मधुकर वालतुरे, देवयानी डोणगावकर, किशोर पवार आदी, तर मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयातून विलास भुमरे आणि रमेश पवार ऑनलाईन होते.
एक वाजता सुरू झालेल्या सभेत दहा मिनिटे बलांडे यांनी अर्थसंकल्पाचे वाचन केल्यावर बाकी सर्व वेळ एकूण गोंधळात गेला. सभापती विषय वाचत होते, तर समोर बसलेले सदस्य विषय मंजूर... म्हणून विषयपत्रिका रेटून नेत होते. दरम्यान, उपाध्यक्ष गायकवाड यांनी, सदस्यांना किमान बोलू तरी द्या, फक्त त्यांच्या भावना ऐकून घ्या, असे म्हणत होते. तसेच डोणगावकर यांनी सभेच्या नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त करीत, सोपस्कार म्हणून सभा घेत आहात का, असा सवाल उपस्थित केला. तसेच पुष्पा काळे यांनी, सोशल डिस्टन्सिंग ठेवून सभा घेऊन सर्व सदस्यांना अर्थसंकल्पावर बोलता आले, असे स्पष्ट केले. पदाधिकारी टोलेबाजी करून सदस्यांचे प्रश्न उडवून लावत होते, तर अवघ्या १ तास २० मिनिटांत राष्ट्रगीताने सभेची सांगता झाली. अनेक सदस्यांना यातून काहीच कळाले नाही. मधुकर वालतुरे यांनी, घाई-घाईत अर्थसंकल्प मंजूर करू नका, असे ठणकावले. मात्र, विषयपत्रिकेवरील विषयांसह अर्थसंकल्प मंजूर झाल्याचे पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले.
---
अधिकारी खूश
सभेच्या एकंदर गोंधळाने विभागप्रमुख आणि अधिकाऱ्यांचे केवळ मनोरंजन केले. या गोंधळात कोणत्याही अधिकाऱ्यावर उत्तर देण्याची वेळच आली नाही. काही अधिकाऱ्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र गोंधळात त्यांचे ऐकू आले नाही. एरवी तीन ते चार तास चालणारी सभा अर्थसंकल्पामुळे लांबेल असे वाटले होते. मात्र, सव्वा तासातच सभा संपल्याने पुढील तीन महिन्यांसाठी सभेचा ताण मिटल्याने, अधिकारी वर्ग खूश होता.
---
आदित्य ठाकरेंच्या नावे पुन्हा एक योजना
समाजकल्याण विभागाकडून आधीच चालक प्रशिक्षणाची योजना असताना, नव्या पाच योजनांत शिवसेनेचे आणि युवा सेनेचे नेते मंत्री आदित्य ठाकरेंच्या नावेही नव्याने योजना जाहीर केली. विशेष म्हणजे पाच योजनांत सर्वाधिक ९५ लाखांची तरतूद, ग्रामीण भागातील मुलांना व्यायामासाठी ओपन जिम उभारण्याच्या योजनेसाठी करण्यात आल्याची माहिती बलांडे यांनी दिली.
---
मागासवर्गीय कल्याणकारी योजनांसाठी २० टक्के निधी
- दिव्यांग कल्याण व पुनर्वसनासाठी ५ टक्के निधी
- बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी १० टक्के निधी
- जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रमाता जिजाऊ चषक स्पर्धेला ५ लाख
- दुर्धर आजारासाठी शाहू महाराज आर्थिक मदत योजनेला १० लाख
- विशेष प्रावीण्य मिळविलेल्या मुलींसाठी सावित्रीबाई फुले गुणवंत पुरस्कारासाठी ५ लाख
- बाळासाहेब ठाकरे यांच्यानावे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला मोफत बियाणे, खतासाठी २० लाख
---
- २०२०-२१ साठी ४०,४१,०८,७३० रुपयांचा सुधारित, तर २२,४३,७६,६८५ रुपयांचा शिलकी अर्थसंकल्प
- २०२१-२२ साठी ४७,३४,२०,००० रुपयांचा मूळ, तर १५ हजार ६८ रुपये शिलकीचा अर्थसंकल्प