औरंगाबाद : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सभा १ मे रोजी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर युवासेनेने शुक्रवारी सायंकाळी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच, या सम दुसरे कुणीही होणार नाही, असा संदेश देणारे होर्डिंग्ज शहरात झळकावले आहेत. शहरातील जालना रोडवर होर्डिंग्ज लावण्यात आले असून, मनसे आणि युवासेनेचे होर्डिंग्ज शेजारीच लावण्यात आले आहेत. सभेचे वातावरण तापलेले असताना युवासेनेने मनसेला डिवचण्याचा प्रकार केला आहे. शिवसेनाप्रमुखांप्रमाणे पेहराव करून कुणाला त्यांच्यासारखे होता येणार नाही.
शहरात मनसेची काहीही ताकद नसून महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा सगळा प्रकार सुरू आहे. त्यांना औरंगाबादकर थारा देणार नाहीत, असा दावा युवासेना जिल्हाधिकारी हनुमान शिंदे यांनी केला. शनिवारी आणखी होर्डिंग्ज लावण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी युवासेनेला प्रत्युत्तर देताना सांगितले, मनसेला हिंदुत्व शिकविण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. शिवसेनाप्रमुखांच्या विचाराला फाटा देऊन सत्ता भोगणाऱ्यांनी आम्हाला सांगू नये.
सभेला लोक नक्कल पाहण्यासाठी येतातमनसेप्रमुख ठाकरे यांच्या सभेने कोणतेही वातावरण बदलणार नाही. सभेने वातावरण बदलण्याची किमया शिवसेनाप्रमुखांमध्येच होती. आता ती हिंमत कोणामध्येही नाही. राज यांच्या सभेला लोक नक्कल पाहण्यासाठी येतात. त्याचा कसलाही परिणाम औरंगाबादवर होणार नाही.- चंद्रकांत खैरे, शिवसेना नेते