औरंगाबाद : बाळासाहेब ठाकरे स्मारकात कमीत कमी बांधकाम ठेवा. म्युझियम, आर्ट गॅलरी, पाथ वे शिवाय इतर सर्व अनावश्यक बाबी बाजूला ठेवा, असे निर्देश आज पालकमंत्री तथा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले. सात दिवसांत स्मारकाची सुधारित निविदा काढा, असे आदेशही त्यांनी महापालिका आयुक्तांना दिले. या निर्णयामुळे स्मारकाचा खर्च ६४ कोटींवरून आणखी कमी होणार आहे.
शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एमजीएम परिसरातील प्रियदर्शिनी उद्यानात उभारण्यात येणाऱ्या बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या जागेची पाहणी केली. त्यानंतर स्मारकासंदर्भात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन निर्णय घ्या, अशी सूचना त्यांनी केली. त्यानंतर लगेच मनपा पदाधिकारी, अधिकाऱ्यांची पालकमंत्र्यांनी बैठक घेतली. बैठकीत आर्किटेक्ट धीरज देशमुख यांनी स्मारकाचे सादरीकरण केले. दिल्ली येथील आर्च होम कन्सल्टंट या प्रकल्प सल्लागार समितीचे कर्मचारीही उपस्थित होते.
दोन वेगवेगळ्या तज्ज्ञांनी तयार केलेल्या स्मारकाचे अंदाजपत्रकही तपासण्यात आले. स्मारकातील बहुतांश कामे रद्द करण्यात आली. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा केंद्रबिंदू ठेवून छोटी-छोटी कामे करावीत. म्युझियम, आर्ट गॅलरी, पाथ वे, पाण्याचा धबधबा या गोष्टी पूर्वीसारख्याच ठेवण्यात आल्या. संपूर्ण स्मारकात १५ हजार चौरस फू ट बांधकाम होईल. पाथ वे चे बांधकाम गृहीत धरून ४० हजार चौरस फूट बांधकाम होईल. स्मारकाचा परिसर आणखी नैसर्गिक कसा ठेवता येईल, यावर भर देण्यात येईल. प्रत्येक ठिकाणी नैसर्गिक दगडांचा वापर होईल. सुधारित अंदाजपत्रक तयार करून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तांत्रिक मान्यता घ्या, अशी सूचनाही पालकमंत्र्यांनी केली.
स्मारकाच्या जागेवर सुरक्षारक्षकांची संख्या आजपासून वाढवावी, पोलिसांची गस्तही रात्री ठेवावी, झाडांसाठी जास्तीत जास्त पाणी उपलब्ध करून द्यावे. स्वच्छतेचे निर्देशही मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांना देण्यात आले. स्मारकासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्याही घेण्यात याव्यात. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.