औरंगाबाद- मनसेप्रमुखराज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये नियोजित असलेल्या सभेवरून राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण पुढे करत पोलिसांनी अद्याप या सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र मनसे औरंगाबादमध्ये १ मे रोजी सभा घेण्यावर ठाम असल्याचे संकेत मिळत आहेत.
मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आज सभा होणाऱ्या मैदानाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासन सभेला नक्कीच परवानगी देतील, असं बाळा नांदगावकर यांनी सांगितलं. पोलिसांना आम्ही सहकार्य करु, असंही त्यांनी सांगितलं. तसेच बाळासाहेब ठाकरेंचा आदर्श राज ठाकरेंच्या समोर आहे. त्यांच्याच खांद्यावर खेळून राज ठाकरे मोठे झाले. मात्र बाळासाहेब हे बाळासाहेब आहेत आणि राज ठाकरे हे राज ठाकरे आहेत, असं बाळा नांदगावकर म्हणाले.
मनसेच्या होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू झाल्याचे वृत्त आले होते. मात्र औरंगाबादमध्ये जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी काल दिली होती. औरंगाबादेत आजपासून ९ मेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात आल्याचं वृत्त काही प्रसारमाध्यमांवर दाखवण्यात आलं होतं. हे वृत्त चुकीचं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.
दरम्यान, राज ठाकरे २९ आणि ३० एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असणार आहेत. तिथे ते कार्यकर्त्यांसोबत बैठका, मनपा निवडणुकीची मोर्चेबांधणी करतील. यानंतर ३० एप्रिलला सायंकाळी ते औरंगाबादकडे रवाना होतील. सभेला परवानगी मिळाली नसली तरीदेखील राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सभेची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीस परवानगीच्या भानगडीत पडू नका, सभेच्या तयारी लागा असे आदेश ठाकरे यांनी मनसेच्या नेत्यांना आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पक्षसूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या- राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार
राज ठाकरेंच्या सभेपूर्वी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार औरंगाबादमध्ये पक्षाच्या एका कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमातून त्यांनी राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. माझी त्यांना विनंती आहे, की त्यांनी इतिहास समजून घ्यावा, असं शरद पवार सभेतील भाषणात म्हणाले.
परवा एका नेत्याने मुंबईत भाषण दिलं आणि भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की, शरद पवार हे सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शाहूराजे यांचेच नाव का घेतात, असं म्हणत माझी विनंती आहे त्यांना की महाराष्ट्राचा इतिहास समजून घ्या. प्रबोधनकार ठाकरे एक विचारवंत महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राचे सामाजिक परिवर्तन यासंबंधी अतिशय उत्तम लेखन केलं. ते जर वाचलं, तर अशा प्रकारचे प्रश्न कोणी विचारणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी नाव न घेता राज ठाकरेंवर निशाणा साधला.