शिरूर अनंतपाळ/ रेणापूर : जून महिना उजाडल्याने शेतकऱ्याला खरीप हंगामाचे वेध लागले असून, शेतीच्या पूर्व मशागतीची कामे पूर्ण करून पेरणीसाठी पैसाच उपलब्ध नसल्याने दुष्काळी अनुदानानंतर राष्ट्रीय पीकविमा, खरीप अनुदानाचे पैसे कधी येतील, याकडे बळीराजाचे लक्ष लागले आहे़ तालुक्यात एकंदर ३४ हजार ५०० हेक्टर्स जमीन असली तरी त्यापैकी २८ हजार ५०० हेक्टर्सवर खरीप हंगामाची पेरणी केली जाते़ तालुक्यात गेल्या तीन वर्षापासून सरासरीपेक्षा निम्मे पर्जन्यमान झाले आहे़ यंदा तर खरीप आणि रबी, असे दोन्ही हंगाम पदरी पडले नसल्याने पेरणीसाठी झालेला खर्चही झालेला नाही़ त्यातच केवळ दुष्काळी अनुदान आले़ परंतू, गारपीठ व खरीप अनुदान अद्यापही आले नसल्याने शेतकऱ्याने खरीपाची पेरणी कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे़ त्यातच जून महिना उजाडल्याने वेळेवर पाऊस झाला तर अडचण होऊ नये़ यासाठी बळीराजा सावकाराकडे पेरणीसाठी खेटे मारत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ खते, बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याकडे पैसे नसल्याने तो अडचणीत सापडला आहे़ त्यामुळे शासनाने लक्ष देऊन रखडलेले गारपीटीचे अनुदान, फळबागेचे व खरीप अनुदान तात्काळ वाटप करावे, अशी मागणी अंगद गुणाले, धोंडिराम कारभारी, पंढरी शिंदे, विठ्ठलराव पाटील, कल्याणराव बिरादार यांनी केली आहे़ पाऊस पडताच पेरणी सुरू करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी तयारी तयारी केली असली तरी त्यांच्याकडेच पैसेच नसल्याने पेरणीचा प्रश्न त्यांच्यासमोर कायम उभा आहे़ त्यामुळे शासनाने लक्ष देऊन शेतकऱ्याला मोफत खते व बियाणांचे वाटप करावे, अशी मागणीही शिरूर अनंतपाळ तालुक्यातून होत आहे़ (वार्ताहर)
बळीराजा सावकाराच्या दारात
By admin | Published: May 31, 2016 11:18 PM