छत्रपती संभाजीनगर : डाव्या चळवळीतील दिग्गज नेते कॉ. सीताराम येचुरी यांना विद्यापीठातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता श्रद्धांजली वाहण्यासाठी एसएफआय विद्यार्थी संघटनेने प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. मात्र, कॉ. येचुरी यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर झालेला नसल्यामुळे परवानगी देता येणार नाही, असे प्रभारी कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
राष्ट्रीय पातळीवरील डाव्या चळवळीतील नेते कॉ. सीताराम येचुरी यांचे गुरूवारी (दि. १२) निधन झाले. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कार्यरत विद्यार्थ्यांच्या एसएफआय संघटनेतर्फे शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडे अधिकृतपणे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, कुलसचिव डॉ. अमृतकर यांनी परवानगी मागणारे एसएफआय संघटनेचे अरुण मते यांना पत्राद्वारे परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. विद्यापीठ प्रशासनाने २३ फेब्रवारी रोजी परिपत्रकाद्वारे विद्यापीठात परिसरात कोणतेही कार्यक्रम घेण्यावर बंदी घातली आहे. तसेच राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला नसल्यामुळे श्रद्धांजली सभेला परवानगी देता येणार नसल्याचेही पत्रकाद्वारे स्पष्ट केले. या निर्णयामुळे एसएफआय संघटनेसह इतर विद्यार्थी संघटना, विद्यापीठ प्राधिकरणांच्या विविध पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
नियोजित ठिकाणी श्रद्धांजली वाहिलीविद्यापीठ प्रशासनाने कॉ. येचुरी यांना श्रद्धांजली वाहण्यास परवानगी नाकारली. तरीही एसएफआय संघटनेतर्फे नियोजित ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेतला. यावेळी अधिसभा सदस्य डॉ. उमाकांत राठोड, डॉ. मारोती तेगमपुरे, योगेश खोसरे, डॉ. लोकेश कांबळे यांनी अभिवादनपर भाष्य केले.