छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणूक २०२४च्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुका होईपर्यंत शासकीय कार्यालय परिसरात आंदोलन करण्यास निर्बंध लावले आहेत.
निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार या सर्व कार्यालयांच्या परिसरात उपोषण, मोर्चे, निदर्शने, घेराव आदी आंदोलने केल्यास फौजदार प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४ अन्वये कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन सभागृहात नोडल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत, राजकीय पक्षांना आचारसंहितेची माहिती देण्यात आली.
आचारसंहितेत कशावर आहेत निर्बंध- प्रचारासाठी कोणत्याही खासगी जागा, इमारती, आवार, भिंतीचा वापर संबंधित मालकाच्या परवानगीविना व प्राधिकरणाच्या परवानगीविना वापर करता येणार नाही.- प्रचारादरम्यान नमुना मतपत्रिका छापून ती मतदारांमध्ये वाटप करता येणार नाही.- संबंधित पोलिसांच्या परवानगीविना ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. सकाळी ६:०० वाजण्यापूर्वी व रात्री १०:०० वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर ध्वनीक्षेपक लावता येणार नाही.- प्रचारादरम्यान पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट, कटआऊट, पेंटिंग, होर्डिंग, कमानींमुळे रहदारीस अडथळा झाल्यास कारवाई होईल.- जिल्हाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, शासकीय, निमशासकीय कार्यालये, विश्रामगृहांच्या इमारती, आवार व परिसराचा प्रचारासाठी वापर करता येणार नाही.- उमेदवारी अर्ज दाखल करताना पाचपेक्षा जास्त व्यक्ती निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात नसाव्यात. - कार्यालय परिसरात मिरवणूक काढणे, सभा घेणे, घोषणा देणे, वाद्य वाजवणे इत्यादी प्रकारे प्रचार करण्यावर बंदी असेल. - निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत शस्त्र परवानाधारकांना शस्त्र बाळगण्यास, वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. - परवानगीशिवाय वाहनांवर झेंडे, बॅनर लावता येणार नाहीत.