औरंगाबाद : वांग्याच्या भाजीतून धोत्र्याच्या बिया खाऊ घालून पत्नी संगीता आव्हाड हिने मुलाच्या मदतीने नवऱ्याचा खून केल्याचे उघड झाले आहे. फरार झालेली मृताची पत्नी आणि मुलाचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक जालना येथे गेले आहे.मुकुं दवाडीतील राजनगर येथील रहिवासी विलास दादाराव आव्हाड (४०) या मजुराचा दहा ते बारा दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नी आणि मुलाने खून केला. त्यानंतर त्यांचा मृतदेह चिकलठाणा शिवारातील नवपुते वस्तीशेजारील एका भूखंडावरील पत्र्याच्या घरात पुरून टाकण्यात आला होता. विलास यांच्या सुनेने याबाबतची माहिती त्यांच्या आईला दिल्यानंतर शुक्रवारी दुपारी या खुनाचे बिंग फुटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी मृताची पत्नी संगीता आणि मुलगा किशोर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. शुक्रवारी सायंकाळी कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह उकरून बाहेर काढण्यात आला. शनिवारी सकाळी या मृतदेहाचे शवविच्छेदन घटनास्थळीच करण्यात आले. तहसीलदारांच्या उपस्थितीत पोलिसांनी पंचनामा केला. खुनाचे बिंग फोडणारी मृताची सून सुरेखा ही शुक्रवारी रात्रीच पोलीस ठाण्यात दाखल झाली. तिला ही घटना समजल्यामुळे ती सिंदखेडराजा (जि.बुलडाणा) येथे माहेरी निघून गेली होती. पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी तिचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. तिने दिलेल्या माहितीनुसार विलास आव्हाड हे घटनेच्या दिवशी कामावरून आले. त्यादिवशी त्यांनी ८०० रुपये मजुरी आरोपी संगीताकडे दिली. विलास यांना कोणतेही व्यसन नव्हते. असे असताना संगीता ही त्यांना सतत त्रास देत असे. घटनेच्या दिवशी संगीताने विलास यांच्यासाठी स्वतंत्र वांग्याची भाजी बनविली. या भाजीसाठी तिने पाट्यावर मसाला वाटला. त्यावेळी तिने धोत्र्याच्या बियाही त्या मसाल्यासोबत रगडल्या. त्या मसाल्याची भाजी तयार करून ती केवळ विलास यांना खाण्यास दिली. नेहमी घरात झोपणारी संगीता ही त्या रात्री पतीसोबत घराच्या अंगणात झोपली. रात्री दहा वाजेच्या सुमारास विलास यांची प्रकृती बिघडली आणि ते बेशुद्ध झाले. त्यानंतर किशोरने शेजारील महेश मोहाडकर याची रिक्षा आणली. त्या रिक्षातून संगीता विलासला घेऊन घटनास्थळी गेली. रात्रभर खोदला खड्डाआरोपी संगीता आणि किशोर यांनी रात्रभर खड्डा खोदून विलासला त्यात पुरले. सकाळी पाच वाजता ते घरी परतले. दुसऱ्या दिवशी पुन्हा तेथे जाऊन विलासच्या प्रेतावर मुरूम टाकला.
वांग्याच्या भाजीतून केला विषप्रयोग
By admin | Published: June 05, 2016 12:11 AM