लातूर : व्यापाऱ्यांकडून मिळणारी हमाली वाढवून देण्याच्या मागणीसाठी लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारपासून जवळपास अडीच हजार हमाल, मापाडी, गाडीवानांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तिसऱ्या दिवशीही बाजार बंद असल्याने उलाढाल ठप्प झाली़ व्यापाऱ्यांनी ३० टक्के दरवाढ देण्यास अनुकूलता दर्शविली मात्र हमाल, मापाडी संघटनेने ५० टक्के दरवाढीवर ठाम राहिले़ परिणामी, तोडगा निघू शकला नसल्याने गुरूवारीही बाजार बंद राहिला़ हमालीचे दर वाढवून मिळावेत म्हणून, हमाल, मापाडी व गाडीवान संघटनेने काम बंद आंदोलन सुरू केले आहे़ व्यापारी संघटना व हमाल संघटनांमध्ये तीन वेळा बोलणी झाली़ मात्र हमालीच्या दरवाढीवर तोडगा निघू शकला नाही़ गुरूवारी बाजार समितीत व्यापारी व हमाल संघटनांची बैठक झाली़ या बैठकीत व्यापाऱ्यांनी ३० टक्के दरवाढ देण्यास अनुकूलता दर्शविली़ परंतु, हमाल संघटनांनी ५० टक्के दरवाढ मिळाली पाहिजे, ही मागणी लावून धरली़ तोडगा निघाला नसल्यामुळे गुरूवारचीही बैठक निष्फळ ठरली़ बैठकीला व्यापारी संघटनांकडून हुकूमसेठ कलंत्री, पांडुरंग मुंदडा, अशोक लोया तर हमाल संघटनांकडून शिवाजी कांबळे, ज्ञानोबा कांबळे, हर्षवर्धन सवई उपस्थित होते़ व्यापारी व हमाल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत दरवाढीवर एकमत न झाल्याने हमालांनी काम बंद आंदोलनाचा निर्णय कायम ठेवला़ परिणामी, तिसऱ्या दिवशीही आडत बाजार बंद राहिल्याने व्यवहार ठप्प होते़ बाजार समितीकडून उपसभापती मनोज पाटील, विक्रम शिंदे, बाळूसेठ बिदादा, तात्यासाहेब बेद्रे, गोविंद नरहरे, संभाजी वायाळ, बाजार समितीचे सचिव मधुकर गुंजकर यांची उपस्थिती होती़ बाजार समितीच्या उपसभापती तसेच सचिवांनी व्यापारी व हमाल संघटनांत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला़ मात्र दरवाढ योग्य मिळत नसल्याने हमाल संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजीचा सूर आवळत काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला़
अडत बाजार तिसऱ्या दिवशीही बंद
By admin | Published: May 04, 2017 11:27 PM