छत्रपती संभाजीनगर : व्हीजेएनटी प्रवर्गात बोगस जात प्रमाणपत्र काढून फायदा घेणाऱ्यांची व बोगस प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्याचे दिलेले आश्वासन शिंदे-फडणवीस व अजित पवार सरकारने पूर्ण करावे व एसआयटी नेमावी या व अन्य मागण्यांसाठी बुधवारी बंजारा, राजपूत भामटा, भटके विमुक्त समाज कृती समितीचा ‘पांढरे वादळ’ महामोर्चा आमखास मैदानावर धडकला. या महामोर्चाला बंजारा समाजाचा सहभाग लक्षणीय ठरला. पारंपरिक वेशभूषेतील बंजारा महिलांनी सहभाग नोंदवला. एसआयटीसाठी आक्रमक झालेला बंजारा समाज पांढरे वादळ महामोर्चात एकवटलेला जाणवला.
दुपारी एकच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चास प्रारंभ झाला. नेहमीचा मार्ग बदलून मोर्चा नूतन कॉलनी, माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज, खडकेश्वर, भडकलगेट मार्गे टाऊन हॉल उड्डाणपुलावरून आमखास मैदानावर आला. तेथे संत सेवालाल महाराज, महानायक वसंतराव नाईक व संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करून सभेला सुरुवात झाली. ‘आज मची है चुहाशाही, ‘बोगस भामटे भाजप भाई भाई’, अशा घोषणा मोर्चात निनादत होत्या. अवघा मोर्चा सेवालालमय होता. गैरमार्गाचा वापर करून सवलती लाटणाऱ्या लोकांपुढे लोटांगण घालून एसआयटी नेमण्याचा निर्णय मागे घेतला असल्याचा आरोप फडणवीस, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आदींवर करण्यात आला. नारायण कुचे, जयकुमार रावळ आदी आमदारांनी बंजारा समाजविरोधी भूमिका घेतल्याचा निषेधही नोंदवण्यात आला.
मोर्चासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. आमखास मैदानावरील सभेचे संचालन राजपालसिंग राठोड यांनी केले. विधान परिषदेचे सदस्य राजेश राठोड, माजी खा. हरिभाऊ राठोड, गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण, बंजारा ब्रिगेडचे राष्ट्रीय अध्यक्ष रविकांत राठोड, आत्माराम जाधव, राजेंद्र साळुंके, डॉ. जगदीश राठोड, सुभाष राठोड, कांतीलाल राठोड, मोहन राठोड, दिगंबर राठोड, कैकाडी समाजाचे संजय मेडे, बुलढाण्याचे राजेश राठोड आदींनी जोरदार भाषणे केली. नंतर शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन विभागीय आयुक्तांना सादर केले.
रोहिदास पवार, रमेश पवार, प्रमोद राठोड, राकेश पवार, प्रा. फुलसिंग जाधव, प्रा. बी. यू. राठोड, मुरहारी पवार, अरुण चव्हाण, विलास राठोड, नंदू पवार, प्रा. सुभाष राठोड, प्राचार्य ग. ह. राठोड, कला राठोड, अमरसिंग चव्हाण, दत्ताभाऊ राठोड, अनिल चव्हाण, वैजनाथ राठोड, जय राठोड व कृती समितीच्या सदस्यांनी मोर्चासाठी परिश्रम घेतले. सर्व चैतन्य महाराज, पोहरादेवीचे रमेश महाराज, भरत चैतन्य व विठ्ठल महाराज सभेच्या वेळी उपस्थित होते.