औरंगाबाद : २ कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचा आलेला ई-मेल खरा समजून ही रक्कम प्राप्त करण्यासाठी स्वत:चे आणि नंतर बँकेचे १ कोटी ६२ लाख ९९ हजार १० रुपये सायबर गुन्हेगारांना पाठविणाऱ्या बँक कर्मचारी महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला. फसवणूक करणाºया कर्मचारी महिलेला बँकेने यापूर्वीच निलंबित केले आहे.अंजली प्रकाश उगले (रा. टाऊन सेंटर, एन-१ सिडको), असे आरोपी महिलेचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, शाहगंज येथील कॅनरा बँकेत अंजली लिपिकपदी कार्यरत होती. जानेवारी महिन्यात तिला एका विदेशी व्यक्तीचा ई-मेल आला. त्यात दोन कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचे नमूद होते. हा मेल खरा असल्याचे समजून अंजली यांनी ई-मेल पाठविणाºया महिलेशी संपर्क साधला. तेव्हा आरोपीने त्यांना लॉटरीचे पैसे पाठविण्यासाठी आयकराची रक्कम, तसेच कस्टम चार्जेस्सह विविध प्रकारची रक्कम तिने दिलेल्या खात्यात वेळोवेळी जमा करण्यास सांगितले. दोन कोटी रुपयांच्या आमिषाला बळी पडून अंजली यांनी प्रथम स्वत:च्या खात्यातील रक्कम त्या महिलेच्या खात्यात जमा केली. मात्र, पैसे कमी पडत असल्याने शेवटी अंजली यांनी ती कार्यरत असलेल्या बँकेच्या विविध जनरल खात्यांतील तब्बल १ कोटी ६२ लाख ९९ हजार १० रुपये परस्पर त्या महिलेच्या खात्यात वर्ग केले. हा प्रकार समजल्यानंतर बँकेने याबाबत चौकशी केली. चौकशीत अंजली दोषी असल्याचे स्पष्ट झाल्याने बँकेने तिला सेवेतून निलंबित केले. बँकेचे शाखा व्यवस्थापक शंकर सुधाकर मिश्रा यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदविली होती. प्रथम हे प्रकरण चौकशीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे आले होते. पोलीस निरीक्षक श्रीकांत नवले यांनी या प्रकाराची चौकशी केली तेव्हा अंजली यांनी लॉटरीच्या आमिषापोटी स्वत:ची आणि बँकेची फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. व्यवस्थापक मिश्रा यांनी ३ जुलै रोजी सिटीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविला. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.सी. देशमाने हे तपास करीत आहेत.चौकटलॉटरीच्या आमिषाला बळी पडू नकाबाहेरच्या देशातील गुन्हेगार लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून सामान्यांना वेगवेगळ्या रकमा भरायला सांगतात. मात्र, विदेशातून येणारी कोणतीही रक्कम भारतीय चलनात येत नाही, तसेच लॉटरीची मिळणारी रक्कम ही रोख स्वरूपात कधीच मिळत नसते. यामुळे लॉटरीच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
बँक कर्मचारी महिलेने बँकेलाच घातला १ कोटी ६३ लाखाचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2019 11:29 PM
औरंगाबाद : २ कोटी रुपयांची लॉटरी लागल्याचा आलेला ई-मेल खरा समजून ही रक्कम प्राप्त करण्यासाठी स्वत:चे आणि नंतर बँकेचे ...
ठळक मुद्देलॉटरीच्या आमिषाला बळी : सिटीचौक ठाण्यात गुन्हा, सायबर पोलिसांकडून तपास