लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : पत्नी आणि मुलांसह घरात झोपलेल्या बँक मॅनेजरची अज्ञात मारेकºयांनी त्यांच्या घरात घुसून गळा चिरून निर्घृण हत्या केली. सातारा परिसरातील छत्रपतीनगरात शुक्रवारी रात्री दोन ते अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, त्यांची हत्या कोणी आणि का केली, याबाबतचा तपास पोलिसांनी सुरू केला.जितेंद्र नारायण होळकर (४७, रा.छत्रपतीनगर) यांची हत्या करण्यात आली. होळकर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके च्या शेकटा (ता. पैठण) शाखेत कार्यरत होते. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मूळचे कांबी (ता. शेवगाव, जि. अहमदनगर) येथील रहिवासी होळकर त्यांची पत्नी भाग्यश्री या जिल्हा परिषदेत कार्यालयीन अधीक्षक आहेत. त्यांची मोठी मुलगी प्रवरासंगम (जि.नगर) येथे अभियांत्रिकीचे शिक्षण घेते. नववीत शिकणारा पंधरा वर्षांचा मुलगा आणि होळकर पती-पत्नी येथे राहतात.शुक्रवारी रात्री मुलगा त्याच्या खोलीत अभ्यास करीत होता, तर होळकर पती-पत्नी शेजारच्या दुसºया खोलीत टीव्ही पाहत होते. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी मुलाच्या खोलीत गेली आणि तेथेच झोपली. रात्री दोन ते सव्वादोन वाजेच्या सुमारास होळकर यांच्या खोलीतून ओरडण्याच्या आवाजाने भाग्यश्री यांना जाग आली. त्या पतीच्या खोलीकडे जाऊ लागल्या, मात्र त्यांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून लावलेला होता. त्यांनी आवाज देऊन कोण आहे, दरवाजा उघडा, असे म्हणत आरडाओरड केली, मात्र कोणीही दरवाजा उघडला नाही. शेवटी त्यांनी मोबाइलवरून शेजारी राहणारे पाठक यांना फोन केला आणि त्यांच्या घरात काहीतरी गडबड सुरू असून कोणीतरी त्यांच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद केल्याने तातडीने घरी या, पोलिसांना बोलवा, असे कळविले. पाठक हे सुमारे अडीच वाजेच्या सुमारास होळकर यांच्या घरी गेले, तेव्हा त्यांना होळकर यांच्या घराचा समोरचा दरवाजा उघडा दिसला. त्यांनी भाग्यश्री यांच्या खोलीचा दरवाजा उघडला आणि ते सर्वजण शेजारच्या खोलीत डोकावले तेव्हा तेथील भयावह चित्र पाहून सर्वांना धक्काच बसला. कोणीतरी जितेंद्र यांची गळा चिरून हत्या केल्याचे दिसले. एवढेच नव्हे तर मारेकºयांनी त्यांचा डावा हात दोरीने बांधला होता आणि दोरीने गळाही आवळल्याचेसमजले. त्यांनी या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षालाकळविली.सातारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक भारत काकडे, उपनिरीक्षक डोईफोडे आणि अन्य अधिकारी, कर्मचाºयांनी सुमारे पावणेतीन वाजेच्या सुमारास छत्रपतीनगरात धाव घेतली.घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर पोलिसांनी त्यांचा मृतदेह घाटी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त राहुल श्रीरामे, सहायक आयुक्त रामचंद्र गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि अन्य अधिकारी, कर्मचाºयांनी घटनास्थळाचा परिसर पिंजून आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही घटनास्थळी पाचारण करून पुरावा शोधला.
बँक मॅनेजरचा गळा चिरून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2017 1:07 AM