पैठण : खरीप हंगामासाठी दिलेल्या टार्गेट पैकी केवळ २०% कर्ज वाटप करणाऱ्या बँकांनी आता रब्बी हंगामासाठी मात्र आखडता हात घेतल्याने परिस्थितीने पिचलेल्या शेतकऱ्यांना खाजगी सावकाराचे दार ठोठावण्याची दुर्देवी वेळ आली आहे. राष्ट्रीयकृत बँका प्रशासनास जुमानत नाही यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात कर्ज पडत नसल्याचे वास्तव सहकार खात्याचे अधिकारी खाजगीत व्यक्त करीत आहेत. राष्ट्रीयकृत बँकेच्या बाबतीत जिल्हाधिकारी यांना कारवाईचा अधिकार असून जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
पैठण तालुक्यात खरिपाच्या सुरवातीला कडक दुष्काळ तर शेवटी झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाची नासाडी होऊन शेतकरी मोडून पडला. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना ५१ कोटी कर्ज वाटपाचे उद्देश तालुक्यातील बँकांना देण्यात आले होते.पैठण तालुक्यात औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १५ शाखा असून या अंतर्गत येणाऱ्या विविध कार्यकारी सेवा सोसायटीची संख्या ९० ईतकी आहे. सोसायटी अंतर्गत ४५९७५ सभासद शेतकरी आहेत. राष्ट्रीयीकृत बँकांची संख्या २१ आहे. खाजगी व व्यापारी बँका ५ असून ग्रामीण बँका ४ आहेत. या बँकांनी व्यवस्थित कर्जवाटप केलेतर शासनाचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट सहज साध्य होते. या बँका पैकी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोडली तर ईतर बँका मात्र शेतकऱ्यांना कर्जवाटप करत नसल्याचे दिसून आले आहे. खरीपाच्या ५१ कोटी पैकी पैठण तालुक्यात औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेने १२ कोटी ३१ लाख ६६ हजार रूपयाचे कर्ज ३४६६ शेतकऱ्यांना वाटले आहे. राष्ट्रीयीकृत बँकांनी किती कर्ज वाटले याचा आकडासुध्दा सहकार खात्याला या बँकांनी दिलेला नाही.
रब्बीसाठी तर नकारचरब्बी हंगामासाठी १० कोटी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे.परंतू आजपर्यंत केवळ १ कोटी ३१ लाख रूपयाचे कर्ज वाटप ३३० शेतकऱ्यांना झाले आहे. परिस्थितीने शेतकऱ्यांच्या शेतात व पदरातही आता काहीच शिल्लक उरलेले नाही. रब्बीचे कर्ज पदरात पडले तरच पेरणी होईल अशी परिस्थिती आहे. या परिस्थितीतून सावरून न्यायचे असेल तर शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय आतातरी शिल्लक राहिलेला दिसून येत नाही. राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्जासाठी अप्रत्यक्षपणे नकार देत असून बँकेत चकरा माराव्या लागत असल्याचे दत्ता फासाटे, सुभाष म्हस्के, सुदाम बोबडे, आकाश सरोदे, पिराजी गायकवाड, विलास निर्मळ, बालकिसन गोर्डे, बापू कदम अशा अनेक शेतकऱ्यांनी सांगितले.
बँकांचा प्रतिसाद नाही औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक व ईतर सहकारी बँकेमार्फत शेतकऱ्यांना व्यवस्थित कर्ज वाटप करण्यात येत आहे. राष्ट्रीयकृत बँका या कर्जवाटपास प्रतिसाद देत नाही असे दिसून आले आहे. बँकनिहाय कर्ज वाटपा बाबत राष्ट्रीयकृत बँकांकडून माहिती मागविण्यात आली आहे. - दिलीप गौंडर, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, पैठण