औरंगाबाद : जिल्हांतर्गत बदलीसाठी सुमारे ३०-३२ शिक्षकांनी सध्याच्या शाळेत रूजू झाल्याची तारीख नजरचुकीने नमूद केल्याचे स्पष्ट झाल्यामुळे ते थोडक्यात बचावले. जाणीवपूर्वक खोटी माहिती भरल्याचे सिद्ध झाले असते, तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित झाली असती. काल आणि परवा झालेल्या सुनावणीत हा प्रकार समोर आल्याने शिक्षकांना घामच फुटला होता.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांची ऑनलाइन जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत माहिती भरताना शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोटी माहिती भरल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. एवढेच नाही, तर अशा शिक्षकांना बदली प्रक्रियेतून देखील बाद करण्याचे शासनाने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. हजाराच्या वर शिक्षकांनी बदलीसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. यातील ३० ते ३२ शिक्षकांनी चुकीची माहिती भरल्याचे शिक्षण विभागाच्या निदर्शनात आल्यामुळे त्यांची शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांच्या समोर ६ आणि ७ डिसेंबर रोजी सुनावणी झाली. तेव्हा सध्या कार्यरत शाळेत रूजू झालेली तारीख अपेक्षित असताना अनेकांनी शिक्षकपदी शाळेत पहिल्यांदा रूजू झाल्याची तारीख नमूद केली होती. याबद्दल शिक्षणाधिकाऱ्यांनी जाब विचारला असता अनेक शिक्षक गर्भगळीत झाले. शाळेत रूजू होण्याच्या तारीख, या वाक्याबद्दल संभ्रम निर्माण झाल्याची कबुली शिक्षकांनी दिली. त्यामुळे त्यांच्यावरील शिस्तभंगाची कारवाई थोडक्यात टळली. या शिक्षकांसाठी ७ व ८ डिसेंबर रोजी यासंदर्भात ऑनलाइन दुरुस्ती करण्यासाठी लॉगीन उपलब्ध करून दिल्याची माहिती समोर आली आहे.
सलग तीनवेळा बदलले वेळापत्रकग्रामविकास विभागाने २० ऑक्टोबर रोजी शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले होते. मात्र ऐन दिवाळीत ही प्रक्रिया राबवली जाणार असल्याची टीका झाल्यामुळे एकाच दिवसात ते रद्द करून नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. त्यानुसार ३१ ऑक्टोबर ते ५ जानेवारी या कालावधीत बदली प्रक्रिया राबविण्यात येणार होती. मात्र, प्रशासकीय कारणास्तव शिक्षकांच्या अर्जांची तपासणी करणे शक्य झाले नसल्यामुळे पुन्हा सुधारित वेळापत्रक जाहीर केले. आता २९ नोव्हेंबर ते १८ फेब्रुवारी या कालावधीत शिक्षकांच्या बदलीचे विविध टप्पे पूर्ण करण्यात येणार आहेत.