औरंगाबाद : जिल्हा परिषदेतील पाच विभागांच्या वर्ग ३ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा बार गुरुवारी उडाला. कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, पंचायत विभागाच्या कर्मचाऱ्यांचे समुपदेशन मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. मंगेश गोंदावले यांच्या उपस्थितीत गुरुवारी सकाळी सुरू झाले, ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू होते. दिवसभरात ११६ जणांचे समुपदेशन करण्यात आले.
जिल्हा परिषदेत नियमित बदल्या आणि विनंती बदल्यांसाठीही अर्ज आले आहेत. पहिल्या दिवशी ११६ जणांची समुपदेशाद्वारे बदली प्रक्रिया राबवण्यात आल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, अजय बोधनकर यांनी दिली. रेल्वेस्टेशन रस्त्यावरील चेलीपुरा हायस्कूल येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात ही प्रक्रिया सुरू आहे. शुक्रवारी वित्त, महिला व बालकल्याण, बांधकाम, पाणी पुरवठा, सिंचन, सामान्य प्रशासन विभागाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर बदल्यांचे आदेश निघतील, अशी माहिती देण्यात आली.