औरंगाबाद : मोंढानाका येथील उड्डाणपुलाचे शनिवारी होणारे उद्घाटन रद्द झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने तो पूल त्याच दिवशी सायंकाळी खुला केला. पोलिसांनी तो पूल शासन आदेशाने पुन्हा बंद करून टाकला. सोमवारी तो पूल वारकऱ्यांनी ‘जय हरी विठ्ठल’अशा घोषणा देऊन आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर पुन्हा खुला केला. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांच्या दिंड्यांचे मोंढानाका पुलावरून छोट्या पंढरपूरकडे प्रस्थान झाले. विशेष म्हणजे सायंकाळपर्यंत तो पूल खुला ठेवल्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली नाही. आकाशवाणीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यामुळे वारकरी संतापले होते. त्यामुळे श्रीफळ फोडून विठ्ठल भक्तांच्या हस्तेच तो पूल खुला करून दिंडी जाण्यासाठी मार्ग मोकळा करून दिला, असे झुंजार वैष्णव वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबन डिडोरे यांनी सांगितले. ४वारकऱ्यांच्या हस्ते तो पूल खुला करण्यात आल्यामुळे आता तो बंद करू नये. शासनाने आता केवळ औपचारिक उद्घाटन करावे, असेही डिडोरे म्हणाले.
टाळ-मृदंगाच्या गजरात वारकऱ्यांनी खुला केला पूल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2015 1:02 AM