औरंगाबाद : महापालिकेतील स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीसाठी १० दिवसांचा कार्यकाळ शिल्लक आहे. त्या पदावर बसण्यासाठी इच्छुकांमध्ये स्पर्धा लागली असून, इच्छुकांच्या मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत. मावळते सभापती गजानन बारवाल यांनी २३ मे रोजी मुंबईत शिवसेना पदाधिकारी मिलिंद नार्वेकर यांची भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेत प्रवेश करून पुन्हा सभापतीपद मिळविण्याच्या त्यांच्या हालचाली सुरू असल्याचे वृत्त आहे.
बारवाल आणि नार्वेकर यांच्या भेटीमुळे शिवसेनेतील उर्वरित इच्छुकांचा रक्तदाब वाढला आहे. या प्रकरणावर कुणीही काहीही बोलण्यास तयार नाही. प्रत्येकाने नेत्यांची मनधरणी सुरू केली आहे. जून २०१८ नंतर स्थायी समितीमध्ये अनेक अर्थपूर्ण प्रस्ताव येणार आहेत. त्यामुळे सभापतीपदावर शिवसेनेतील जवळपास सर्व सदस्यांचा डोळा आहे.
बारवाल यांना शिवसेनेत आणण्यात महापौर घोडेले-बारवाल यांची मोठी भूमिका राहणार आहे. त्यांना पक्षात आणून पुढील वर्षभर पालिकेवर आर्थिक कंट्रोल ठेवण्याचा सेनेचा मनसुबा आहे. रस्त्यांच्या, स्मार्ट सिटी, घनकचरा व्यवस्थापन कामाच्या सुमारे ७०० कोटींच्या निविदांवर डोळा ठेवूनच सभापतीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. बारवाल यांना सभापतीपद दिल्यास शिवसेनेतील नाराजांची संख्या निश्चितपणे वाढेल. विद्यानगरचे नगरसेवक राजू वैद्य, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, ऋषिकेश खैरे, नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांची नावे सभापतीपदासाठी चर्चेत आहेत.
मी वैयक्तिक कामासाठी गेलो होतोसभापती गजानन बारवाल यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, मी वैयक्तिक कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. मी शिवसेना पदाधिकारी नार्वेकर यांना भेटण्यासाठी गेलो नव्हतो. माझे काम होते म्हणून सर्वसाधारण सभेला हजर न राहता मुंबईत गेलो होतो.