औरंगाबाद: औरंगजेबाने संभाजी महाराजांना मृत्युदंडाची शिक्षा दिली. परंतु, त्याची अंमलबजावणी पेशव्यांनी मनुस्मृतीप्रमाणे केली. त्यांना हाल हाल करून मारले. हे पुणे जिल्ह्यात घडले. म्हणून पुणे जिल्ह्यालाच संभाजीनगर हे नाव देणे हे तर्काला धरून होईल, असे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी गुरूवारी येथे पत्रपरिषदेत सांगितले.
कॉंग्रेस आमचा मित्रपक्ष असला तरी आगामी सर्व निवडणुका आम्ही स्वबळावर लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. औरंगाबाद महापालिकेच्या किमान २१ जागा आम्ही स्वबळावर लढू,असे ते म्हणाले.
नामविस्तार दिनानिमित्त ते औरंगाबादेत आले होते. नेत्यांच्या सभांना परवानगी नाकारल्याने कवाडे यांचीही सभा रद्द झाली. मात्र, त्यांनी दुपारी भडकलगेटवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ते विद्यापीठ गेटवर आले. तेथे त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास, नामांतर शहीद स्मारकास व विद्यापीठ गेटला अभिवादन केले.
नामांतराच्या संघर्षमय लढ्यांतून दलित समाज तेजस्वी व स्वाभिमानी बनला अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
येत्या २६ जानेवारीपासून पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे देशभर आत्मनिर्भर अत्याचार प्रतिकार अभियान राबविण्यात येत आहे. अन्याय अत्याचाराच्या विरोधात प्राणपणाने प्रतिकार करा, असा संदेश यातून आम्ही देऊ इच्छितो. तसेच संविधानाला मानणाऱ्या सर्व मंडळींना सोबत घेऊन संविधान बचाव आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची माहिती कवाडे यांनी दिली.
वंचित बहुजन आघाडी ही संधीसाधू व स्वार्थी लोकांची ठिसूळ संघटना आहे. तेथे कामापुरतं मामा असे लोक एकत्रित आले आहेत. आमची रिपब्लिकन चळवळ आहे. ही चळवळ प्रकाश आंबेडकर यांना का सोबत घ्यायची नाही, अशी टीका एका प्रश्नाच्या उत्तरात कवाडे यांनी केली.
जनगणनेच्या कॉलममध्ये धर्म बौद्ध लिहा आणि जातीच्या कॉलममध्ये आपापली जात लिहा, हे भारतीय बौद्ध महासभेचे भीमराव आंबेडकर यांनी केलेले आवाहन बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीला व जातीअंताच्या संकल्पनेला छेद देणारे आहे, अशी टीका प्रा. कवाडे यांनी केली.
कृषी कायदे कसे शेतकरीविरोधी आहेत,याचे विवेचनही त्यांनी केले.
जयदीप कवाडे, गोपाळराव आटोटे, पडघन गुरुजी, अशोक जाधव, लक्ष्मण कांबळे, चरणदास इंगोले, सुमेध गायकवाड, शेषराव सातपुते, कढूबा जाधव, रामदास लोखंडे, माधव सूर्यवंशी, सदाभाऊ वेळुंजकर आदींची यावेळी उपस्थिती होती.