पिंप्री राजा : गावातील वार्ड क्र.६,व वार्ड क्र.३ मधील सय्यद गल्ली, पठाण गल्लीतील रहिवाशांसह ग्रामपंचायत सदस्यांनी पायाभूत सोयी सुविधा मिळत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावले.
औरंगाबाद तालुक्यातील पिंप्री राजा ही १७ सदस्य असलेली ग्रामपंचायत असून, वार्ड क्रमांक ६ व ३ मधील सय्यद गल्ली आणि पठाण गल्लीत पिण्याचे पाणी आणि सांडपाण्याची व्यवस्था करण्याची मागणी अनेक दिवसांपासून ग्रामस्थ करीत होते. याचा सतत पाठपुरावा करुनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याच्या निषेधार्थ सोमवारी या वार्डांतील सदस्यांसह रहिवाशांनी ग्रामपंचायत कार्यालयावा मोर्चा काढला.
यावेळी ग्रामविकास अधिकारी सी. जी. राऊत यांना याबाबत जाब विचारला मात्र, ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. त्यामुळे ग्रामपंचायत कार्यालयास टाळे लावण्यात आले. त्यानंतर ग्रामविकास अधिकारी राऊत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे अधिकारी वार्डांची पाहणी करून ठोस आश्वासन देत नाही तोपर्यंत टाळे उघडण्यात येणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून दिला आहे. यावेळी उपसरपंच शेख अस्लम, ग्रामपंचायत सदस्य संजय जैस्वाल, संजय साबळे, हरीभाऊ जाधव, सय्यद युनूस, शाकेर बागवान,भारत घोरपडे,अंकुश नरवडे, कादिर शेख यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.