वाळूज महानगर : विविध नागरी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी वाळूज ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन तास ठिय्या दिला. या प्रसंगी आंदोलकांनी सरपंच पपीनकुमार माने यांना जाब विचारल्यानंतर सुविधा पुरविण्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
वाळूज येथील भारतनगरात विविध नागरी सुविधांचा अभाव असल्यामुळे रहिवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या वसाहतीला दहा ते पंधरा दिवसांआड पाणी पुरवठा केला जात आहे. यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रारी करुनही याची दखल घेतली जात नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यातच ड्रेनेजलाईन नसल्याने सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचरा संकलनासाठी घंडागाडी येत नसल्याने नागरिक उघड्यावरच कचरा टाकत आहेत. अंतर्गत रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून, पाऊस पडल्यानंतर रस्त्यावरच पाणी साचते. त्यामुळे नागरिकांना चिखल व पाण्यातून वाट तुडत जावे लागत आहे.
भारतनगरमध्ये नागरी सुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत प्रशासन टाळाटाळ करीत असल्याने सोमवारी नागरिकांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर दोन तास ठिय्या दिला. या भागातील समस्या निकाली काढण्याचे आश्वासन सरपंच माने यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात रतन अंबीलवादे, शेख हारुण, जावेद शेख, रियाज शेख, शोभा मोरे, नजमा शेख, सलमा शेख, संगिता पंडीत, ताहेरा शेख, संगिता मोरे, कमल लोखंडे,सईदा शेख, फरजाना शेख,सागर पठारे, सुशि निकम आदीसह अनेकांनी सहभाग नोंदविला होता.