वाळूज महानगर : सिडको वाळूज महानगरातील सारा भूमी सोसायटीत मूलभूत सुविधा नसल्यामुळे रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या सोसायटीतील रहिवाशांनी या निषेधार्थ सोमवारी सोसायटी परिसरात बिल्डरविरोधात घोषणाबाजी केली.
सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रातील गट नंबर ५२/२ मध्ये सारा बिल्डर्सने फ्लॅट बांधून ते विक्री केले. मात्र, या सोसायटीतील ड्रेनेजलाईन, अंतर्गत रस्ते, वीज, पाणी आदी प्रश्न प्रलंबित असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाणीप्रश्न सोडविण्यासह सोसायटीतील खोदलेले रस्ते पूर्ववत तयार करुन द्यावेत, यासाठी रहिवाशांनी बिल्डरकडे पाठपुरावा केला आहे.
मात्र, बिल्डरकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. दोन दिवसांपासून परिसरात पाऊस होत असल्याने या सोसायटीतील रहिवाशांना चिखल तुडवित ये-जा करावी लागत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या या रहिवाशांनी सोमवारी सोसायटीत बिल्डरविरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलनात आर.आर.पाटील, जगन पाटील, रुपेश बजाज, अरुण आहेर, चंद्रकांत पाटील, सागर महाजन, शाहीन शेख, रुपाली ससे, सविता थोरात, रेखा आहेर, अर्चना वैद्य, स्वाती बजाज, सुरेश वैद्य, संतोष सूर्यवंशी, गणेश सोनार, विविेक मेहेत्रे, शिवप्रसाद सूर्यवंशी, प्रकाश खांडेकर, जी.एस.सुर्यवंशी आदींनी सहभाग नोंदविला होता.