छत्रपती संभाजीनगर : सिव्हिल अभियंता असलेला ३७ वर्षीय तरुण महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास विभागात कंत्राटी पद्धतीवर महिना १२ हजार रुपये पगारावर नोकरी करतो. परंतु, त्यातही वरिष्ठ लिपिक तो पगार करण्यासाठी त्याला २ हजार रुपये मागून पगार थकीत ठेवत होता. तरुणाने त्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यावरून बीडच्या पथकाने बुधवारी दुपारी शिवाजी कैलास ढोरमारे याला चेलीपुऱ्याच्या कार्यालयासमोर १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
मूळ बीडचा असलेला ३७ वर्षीय तरुण ११ वर्षांपासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास विभागात कंत्राटी सहायक अभियंता आहे. त्यांचा जवळपास १५ महिन्यांचा पगार थकला होता. त्यापैकी १० महिन्यांचा पगार काढण्यासाठी शिवाजीने त्यांच्याकडून प्रति महिना २ हजार असे आधी २० हजार रुपये घेतले. परंतु, पुन्हा जून ते ॲाक्टोबरच्या वेतनासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. त्याच्या छळाला कंटाळून तरुणाने त्याची थेट अधीक्षक संदीप आटाेळे यांच्याकडे तक्रार केली. आटाेळे यांच्या सूचनेवरून उपअधीक्षक शंकर शिंदे यांनी सहकाऱ्यांसह बुधवारी सापळा रचला.
हाताच्या बाह्या वर केल्या अन् शिवाजीच्या मुसक्या आवळल्याचेलीपुरा हायस्कूल इमारतीसमोरील चहाच्या टपरीवर शिवाजीने तरुणाला बोलावले. तक्रारदार त्याच्या जवळ गेला. लाच स्वीकारताच अभियंत्याने बाह्या वर करण्याचा इशारा ठरला होता. शिवाजीने १० हजार रुपये स्वीकारले. तरुणाने बाह्या वर केल्या आणि दबा धरून बसलेल्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्यावर वेदांतनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अंमलदार श्रीराम गिराम, हनुमान गोरे, भरत गारदे यांनी कारवाई पार पाडली.छायाचित्र