पैठण : तहसील कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीस गैरहजर राहिलेल्या बीएलओ (मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी) तहसीलच्या ‘कारणे दाखवा नोटीस’लाही कचऱ्याचा डबा दाखविला आहे. २४ तासांत उत्तर देण्याचे आदेश बजावूनही बीएलओसाठी नियुक्त केलेल्या २२ पैकी फक्त दोन गुरुजींनी तीन दिवसानंतर थातूर-मातूर खुलासा तहसील कार्यालयात सादर केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय कार्यात हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. आमच्याच वाट्याला हे काम का देण्यात येते यावरून गुरुजी नाराज असल्याचे समोर आले आहे.
पैठण तालुक्यातील मतदारयादी भागाचे पुनरिक्षण कार्यक्रम १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर सुरू असून यासाठी तालुक्यातील गुरुजींची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून विविध भागांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या अनुषंगाने दि. ८ व ९ सप्टेंबरला सहायक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी बीएलओ यांची बैठक बोलाविली होती; परंतु बीएलओ म्हणून नियुक्त केलेल्या २२ गुरुजींनी या बैठकीकडे पाठ फिरविली. त्यानंतर दि. ११ व १३ रोजी तालुका प्रशासनाच्या वतीने या गुरुजींच्या मोबाईलवर संपर्क साधून तहसील कार्यालयातून कामकाजाचे साहित्य घेऊन जाण्याबाबत सूचना देण्यात आल्या. या सूचनासही गुरुजींनी गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे तहसीलदार शेळके यांनी या गुरुजींना २४ तासांच्या आत खुलासा करा, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी खरमरीत नोटीस दि. १५ सप्टेंबरला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत बजावली. प्रशासनाच्या या नोटिसीलाही गुरुजींनी अजिबात गांभीर्याने घेतले नाही. केवळ दोन गुरुजींनी थातूर-मातूर खुलासा सादर केला. अनेक विभागांत कामे नसल्याने कर्मचारी बसून आहेत, त्यांना निवडणुकीचे कामे न देता केवळ गुरुजींनाच या कामासाठी टार्गेट केले जाते, अशी धारणा गुरुजींची झाली असल्याची चर्चा समोर आली आहे. नोटिसीनंतर आता प्रशासन काय पाऊल उचलते व गुरुजी त्यास कसा प्रतिसाद देतात, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
कोट
नियमांनुसार कारवाई करणार
गैरहजर ‘बीएलओ’च्या भागातील काम पूर्ण होण्यास बाधा निर्माण झाली असून अत्यंत गंभीर स्वरूपाची ही बाब आहे. त्यामुळे पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू शकतात. सदर महत्त्वाच्या राष्ट्रीय कार्यात हेतूपुरस्सर टाळाटाळ केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५० चे कलम ३२ नुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.
- चंद्रकांत शेळके, मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, पैठण