मुबीन पटेल ।लोकमत न्यूज नेटवर्कपिशोर : चालू शैक्षणिक वर्षात महाविद्यालयाने मागणी केलेल्या अतिरिक्त तुकड्या अद्यापपर्यंत मंजूर न झाल्याने ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले असून विद्यापीठाच्या आडमुठे धोरणामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या समस्येवर अद्याप तोडगा न निघाल्याने हजारो विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक चिंतेत आहेत.कन्नड तालुक्यातील पिशोर गावात तीन कनिष्ठ महाविद्यालये असून दहा कि.मी.च्या परिसरात सहा कनिष्ठ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयातून दरवर्षी हजारो विद्यार्थी विज्ञान, कला शाखेतून उत्तीर्ण होऊन पदवीसाठी प्रवेश घेतात.पिशोर येथे असलेल्या एच.बी. वरिष्ठ महाविद्यालयात पदवीच्या प्रत्येक शाखेची एक एक तुकडी आहे. या महाविद्यालयातील तुकड्यांची प्रवेश क्षमता १२० असल्याने प्रवेश केव्हाच ‘फुल्ल’ झाले आहेत. आधी आलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले, मात्र दरवर्षी मिळणारा ५० टक्के वाढीव कोटा कपात करुन यावर्षी फक्त १० टक्केच वाढीव प्रवेश विद्यापीठाने दिले. यामुळे उर्वरित अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रवेशाच्या गोंधळाबाबत अनेक विद्यार्थ्यांनी लोकमत प्रतिनिधीकडे आपली कैफियत मांडली.सदरील प्रवेश प्रक्रियेबाबत संस्थेचे संस्थापक ए. बी. लोखंडे यांनी सांगितले की, आम्ही विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे प्रवेश दिलेले असून जास्तीचे प्रवेश आम्ही देऊ शकत नाही. प्रवेश क्षमता वाढवून देण्यासाठी आम्ही विद्यापीठाला पत्र दिलेले असून अतिरिक्त तुकडीची सुद्धा मागणी केलेली आहे. विद्यापीठाने प्रवेश क्षमता वाढवून दिल्यास किंवा अतिरिक्त तुकडी मंजूर केल्यास उर्वरित विद्यार्थ्यांना प्रवेश देऊ.
तुकड्यांना मान्यता न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे पदवी प्रवेश रखडले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2017 12:25 AM