श्यामकुमार पुरे
सिल्लोड : तालुक्यात ८३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होत असून, २ हजार ३१९ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. सोमवार उमेदवारी मागे घेण्याचा दिवस असल्याने यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल. विरोधकांना चित करण्यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार आखाड्यात उतरले असून, अधिकाधिक ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात कशा येतील, यासाठी ते प्रयत्नशील आहेत, तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे या निवडणुकीच्या माध्यमातून तालुक्यातील अस्तित्व समोर येणार आहे.
या निवडणुका स्थानिक पातळीवर होत असल्याने भाजप व शिवसेनेचे प्रत्येक गावात पॅनल उभे आहे. तालुक्यात खरी लढत शिवसेनाविरुद्ध भाजप यांच्यातच होणार असल्याची चिन्हे आहेत. सिल्लोड आणि सोयगाव या दोन्ही तालुक्यात भाजप कार्यकर्ते यांची मोठी फळी आहे. त्यामुळे ग्रामपंचायती कशा भाजपच्या ताब्यात येतील, यासाठी भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य सुरेश बनकर, सरचिटणीस इंद्रिस मुलतानी, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर मोठे रणनिती आखत आहेत.
--- अजिंठ्यातील दोन्ही गट एकत्र -----
अजिंठा ग्रामपंचायतीमध्ये सैयद नासेर हुसेन व अब्दुल अजीज चाऊस गट नेहमी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकत. मात्र, विधानसभा निवडणुकीपासून अब्दुल सत्तार यांनी या गटास एकत्र आणत त्यांना बळ दिले. गेल्या १० वर्षांपासून चाऊस गटाच्या ताब्यात ग्रामपंचायत असून, त्यांच्याकडे गावातील बडे पुढारी आहेत. त्यांना मात देण्यासाठी नजीर गाईड, महेबूबखा पठाण, मेघराज चोंडिये यांनी पॅनल उभे केले. अब्दुल सत्तार हे अनेक गावात भाजप व विरोधी पक्षात फूट पाडून कार्यकर्ते त्यांच्याकडे ओढत भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीला हद्दपार करण्यासाठी रणनिती आखत आहेत.
---- भराडीतील समीकरणे बदलली ------
भराडीची ग्रामपंचायत २०१५ मध्ये काँग्रेसच्या, तर तत्पूर्वी भाजपच्या ताब्यात होती. मात्र, आता गावातील समीकरणे बदलली असल्याचे चित्र आहे. गेल्या निवडणुकीत गजानन महाजन व अनिस पठाण यांनी निवडणूक एकत्र लढवली होती. यासह श्रीराम महाजन पूर्वी अब्दुल सत्तार यांच्यासोबत होते, ते आता विरोधात असल्याने स्वतंत्र पॅनल उभे केले आहे. या निवडणुकीत इतर पक्ष, भाजप व गजानन महाजन एकत्र लढत असून, शिवसेनेच्या अनिस पठाण यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी अनिस पठाण यांच्या बाजूने भराडीत जोर लावल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
----- या ग्रामपंचायतींवर तालुक्याचे लक्ष ----
सिल्लोड तालुक्यातील दिग्गज नेत्यांचे होम पिच असलेली भराडी, अंधारी, भवन, गोळेगाव, आमठाना, तळणी, बोरगाव कासारी, पिंपळदरी, गव्हाली तांडा, शिवना, पालोद, पानवडोद, के-हाळा, गेवराई सेमी, अजिंठा, घाटनांद्रा आदी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष राहणार आहे. या ठिकाणी होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर मतदारांसह गावपुढाऱ्यांचे लक्ष्य आहे.