खुलताबाद पंचायत समिती कार्यालयातील प्रकार
खुलताबाद पंचायत समिती कार्यालयातील प्रकार :
खुलताबाद : आतापर्यंत तालुकास्तरीय शासकीय कार्यालयांचा इतिहास पाहता अधिकारी हे शहरातून अपडाऊन करताना तर कर्मचारी हे मुख्यालयी राहताना दिसत होते. मात्र खुलताबाद पंचायत समितीचे चित्र वेगळे आहे. येथे गटविकास अधिकारी हे मुख्यालयी राहतात तर इतर अनेक कर्मचारी हे बाहेरुन अपडाऊन करतात. कर्मचारी वेळेवर येत नसल्याने नागरिकांना कामासाठी ताटकळावे लागत असल्याच्या तक्रारी यामुळे वाढल्या आहेत.
खुलताबाद पंचायत समिती कार्यालय व अंतर्गत असलेल्या सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी हे ११ ते १२ नंतरच कार्यालयात येतात. यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना कर्मचाऱ्यांची वाट पाहावी लागते. गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे कार्यालयात बहुतेक वेळा नागरिक येत नव्हते; मात्र काही महिन्यांपासून कार्यालयीन कामकाज सुरळीत सुरू झाले असून नागरिकांची गर्दी वाढली आहे. बहुतांश कर्मचारी वर्ग औरंगाबाद येथून अपडाऊन करीत असल्याने वेळेवर येण्यासाठी उशीर होतो. यामुळे नागरिक वाट पाहत ताटकळतात. काही कर्मचारी दुपारनंतर कार्यालयात येत असून त्यांच्यावर कोणाचाच वचक नसल्याचे दिसून येते. अनेक जण पाच दिवसांत दोनदाच हजेरी लावत असल्याच्याही तक्रारी आहेत. अशा कामचुकार धोरणामुळे व कुणाचा वचक नसल्याने पंचायत समितीच्या कामाबाबत जनतेत नाराजीचा सूर आहे. गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर खुलताबाद मुख्यालयी राहत असल्याने ते वेळेत हजर असतात; मात्र कार्यालयीन कर्मचारी व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी दुपारनंतरच येत असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
९९ टक्के कर्मचारी करतात अपडाऊन
खुलताबाद पंचायत समितीचे ९९ टक्के कर्मचारी औरंगाबाद येथून अपडाऊन करतात. यात शिपाई वर्गाचा सुद्धा समावेश आहे. विशेष म्हणजे सर्वजण खुलताबाद येथे राहत असल्याने घरभत्ता भाड्याचा लाभ घेत आहेत. त्यामुळे शासनाची एक प्रकारची फसवणूक केली जात आहे.