औरंगाबाद : शहानूरमियाँ दर्गा परिसरात रस्त्यावर, महापालिकेच्या खुल्या जागेवर कचरा आढळून आल्याने मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘इथे माणसं राहतात याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे’, अशा शब्दात खडे बोल सुनावले. कचरा उचलणाऱ्या रेड्डी कंपनीला दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला. स्वच्छता निरीक्षकास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
प्रशासक पाण्डेय यांनी बुधवारी सिडको, रेल्वे स्टेशन, शहानूरमियाँ दर्गा रोड, कालिका माता मंदिर, बाळकृष्णनगर, कारगिल उद्यान, विजयनगर आदी भागांची पाहणी केली. कालिका माता मंदिराच्या बाजूला महानगरपालिकेच्या जागेची पाहणी करण्यासाठी जात असताना शहानूरमियाँ दर्गा रोडवरील कृषी विभागाच्या लगत रस्त्याच्या कडेला कचरा आढळून आला. कचरा तातडीने उचलण्याचे आदेश संबंधित स्वच्छता निरीक्षकास दिले. यानंतर मंदिराच्या बाजूला महानगरपालिकेच्या जागेची पाहणी केली. या जागेच्या आजूबाजूला झाडाझुडपातून, नाल्यातून वाट काढत चारही बाजूंनी प्रशासकांनी पाहणी केली.
आसपासच्या नागरिकांनी तेथे कचरा टाकल्याचे मनपा प्रशासकांच्या निदर्शनास आले. यावेळी स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, वाॅर्ड अधिकारी व रेड्डी कंपनीचे कर्मचारी उपस्थित होते. साचलेला कचरा बघून संतप्त झालेल्या पाण्डेय यांनी संबंधितांना जाब विचारला असता सर्वांची दमछाक झाली. वॉर्ड अधिकाऱ्यास समज देऊन, यापुढे आपल्या परिसरात कुठे कचरा आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासकांनी दिला. यावेळी शहर अभियंता एस. डी. पानझडे, उपायुक्त अपर्णा थेटे, वॉर्ड अधिकारी न्याते, स्वच्छता निरीक्षक सचिन भालेराव आदी उपस्थित होते.
इमारत निरीक्षक करतात काय?शहानूरमियाँ दर्गा परिसरात एका इमारतीचे बांधकाम सुरू होतेे; परंतु बांधकाम नियमांचे पालन केले नसल्याने संबंधितास दंड आकारण्याचे आदेश दिले. इमारत निरीक्षक कुठे आहेत, असा जाब त्यांनी वॉर्ड अधिकाऱ्यास विचारला असता त्यांना उत्तर देता आले नाही. यापुढे असे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. विजयनगर, कृष्णा नगर आदी भागातील ड्रेनेजसंदर्भात पाहणी केली करून तेथील नागरिकांशी संवाद साधला.