औरंगाबाद : मुंबईहून ट्रॅव्हल बसने औरंगाबादला आलेल्या महिलेची १ लाख ३० हजार रुपयांची बॅग प्रवासादरम्यान चोरी झाली. याप्रकरणी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. हा गुन्हा पुढील तपासासाठी नेवासा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
क्रांतीचौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. जी. एच. दराडे यांनी सांगितले की, तक्रारदार रंजना शिरसाट या २८ डिसेंबर रोजी रात्री १० वाजता मुंबईतून डॉल्फिन ट्रॅव्हलच्या बसने औरंगाबादला येत होत्या. तीन बॅग सीटजवळ ठेवून त्या बसमध्ये झोपल्या. नेवाशाजवळ आल्यावर त्यांना जाग आली तेव्हा त्यांची दागिने आणि पैसे असलेली बॅग चोरी झाल्याचे दिसले. त्यांनी बसचालक आणि क्लीनर यांना आवाज देऊन बस थांबवा आणि जवळच्या पोलीस ठाण्यात नेण्याचे सांगितले. तेव्हा त्यांनी बस थांबविली नाही. औरंगाबादला प्रवासी उतरल्यावर त्यांनी बस क्रांतीचौक ठाण्यात नेली. तेथे शिरसाट यांनी तक्रार नोंदविली. त्यांच्या बॅगमध्ये एक लाख रुपयाचे सोन्याचे दागिने आणि रोख ३० हजार रुपये होते. ते चोरी झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.