वैजापुर (औरंगाबाद ) : एशियाड बसमधून रोख रक्कम व दागिन्यावर हातसाफ करून गारज बसस्थानकावर उतण्याच्या प्रयत्नात असलेल्या चार महिलांना देवगांव रंगारी पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले. या कारवाईमुळे मागील काही दिवसात बसप्रवासात मोठ्या प्रमाणात झालेल्या चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी औरंगाबादहुन नाशिककडे जाणाऱ्या एशियाड बसमध्ये नगर नाक्यावरून चार महिला बसल्या. देवगांव ते गारज या दरम्यान त्यांनी शिऊर येथील एका महिलेच्या बॅग मधून पाच हजार रुपयांची रोख रक्कम चोरली. याचा संशय आला असता त्या महिलेने गारज येथील बसस्थानकावर बस थांबवली. ग्रामस्थांच्या मदतीने त्या चार महिलांची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरी केलेले पाच हजार सापडले. यानंतर घटनेची माहिती देवगांव रंगारी पोलिसांना दिली असता त्यांनी गरज येथून चारही महिलांना ताब्यात घेतले. या चारही महिला कोपरगाव (जिल्हा अहमदनगर) येथील रहिवासी आहेत. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. शिऊर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी धुळे येथील महिला चोरांची टोळी बसमध्ये पकडल्याची माहिती यावेळी पोलिस उपनिरीक्षक धनंजय फराटे यांनी दिली.
धुळे, कोपरगाव येथील टोळी गेल्या काही दिवसापासून औरंगाबाद ते वैजापुर मार्गे जाणाऱ्या बसमध्ये महिला चोरांची टोळी सक्रिय आहे. प्रवासात त्यांचे वागणे व पेहराव पाहून त्यांच्याबद्दल कोणालाही शंका येणार नाही. मात्र ही एक महिला चोरांची टोळी आहे. बसमध्ये या टोळीने सध्या धुमाकूळ घातलाय. दिवसाढवळ्या प्रवासाच्या निमित्ताने ही टोळी मौल्यवान वस्तूंवर हातसाफ करत आहे. प्रवाशांना बोलण्यामध्ये गुंतवून त्या मोठ्या शिताफीने रोख रक्कम व मौल्यवान वस्तू चोरतात. यात मुख्यत: धुळे व कोपरगावातील महिला चोरांची टोळी सक्रीय आहे.