छत्रपती संभाजीनगर : मागील आठ दिवसांपासून बदलत्या हवामानानुसार छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याच्या तापमानात सतत चढउतार होत आहे. आठ दिवसांपासून ४० अंशांच्या खाली असलेले तापमान मंगळवारी अचानक वर गेले. चिकलठाणा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी शहराचे तापमान ४१.६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले होते. तर जिल्हा हवामान केंद्राने दिलेल्या अहवालानुसार, रविवारपर्यंतचे सर्व दिवस कडक तापमानाचे असतील. यामुळे शक्यतो दुपारी उन्हात जाण्याचे टाळावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
पैठण रोडवरील कृषी विज्ञान केंद्राच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर शहर आणि तालुक्यात २२ मे रोजीचे तापमान जास्तीत जास्त ४३.१ अंश सेल्सिअस असेल. तर कमीत कमी ३०.१ अंश असेल. २३ मे रोजी तापमान कमी होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला. गुरुवारी शहराचे कमाल तापमान ४२.२ अंश तर किमान २७.४अंश सेल्सिअस असेल. २४ मे रोजीही कमाल ४२.७ अंश सेल्सिअस तर किमान २७.४ अंश सेल्सिअस असेल. २५ मे रोजी तापमानात वाढ होऊन ४३.१ अंशापर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे. तर २६ मे रोजी ४२.२ अंश तापमान असण्याचा अंदाज आहे. या कालावधीत अंशत: ढगाळ वातावरण असेल, असेही कृषी विभागाच्या हवामान पत्रिकेत नमूद करण्यात आले.