छत्रपती संभाजीनगर : शहर परिसरात यंदाच्या तापमानाची उच्चांकी नोंद झाली. कमाल तापमानाचा पारा ४०.५ अंश सेल्सिअसवर गेला. किमान तापमान २६.६ अंश सेल्सिअस होते, तर हवेतील आर्द्रता ४९ टक्के होती. कडक ऊन असल्यामुळे रस्त्यावरील रहदारीवर परिणाम झाला होता. सायंकाळी ६ वाजेनंतर वादळी वारे आणि अवकाळी पाऊस असे वातावरण शहर व परिसरातील नागरिकांनी अनुभवले.
मे महिन्यातील तापमान एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच अनुभवायास मिळते आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तापमान आणखी वाढण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ वर्तवित आहेत. गेल्या पंधरा दिवसांत तापमानात चढ-उतार, अवकाळी पाऊस असे हवामान नागरिकांनी अनुभवले. १ एप्रिलपासून संमिश्र वातावरणामुळे तापमान कमी-अधिक होत आहे. १२ व १३ रोजी तापमान ३५.३ अंश सेल्सिअसवर होते. १४ एप्रिल रोजी ३७.४ अंश सेल्सिअसवर तापमान गेले. १५ रोजी ३९.३, तर १६ रोजी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
ड्रायनेसचा हा परिणाम...पठारी प्रदेशात कोरडे हवामान (ड्रायनेस) वाढला आहे. त्यामुळे तापमान वाढले आहे. मे महिन्यात जे तापमान असायला हवे, ते एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच वाढले. पुढील काही दिवसांत तापमान वाढण्याची चिन्हे आहेत. परिणामी, मान्सूनपूर्व पाऊस चांगला बरसेल, असे सध्या म्हणता येईल.- श्रीनिवास औंधकर, हवामान तज्ज्ञ
एप्रिल महिन्यांतील सर्वाधिक तापमान कधी२९ एपिल २०१५: ४१.६ अंश सेल्सिअस२९ एप्रिल २०१९: ४३.६ अंश सेल्सिअस१७ एप्रिल २०२१: ४०.८ अंश सेल्सिअस२० एप्रिल २०२२: ४१.६ अंश सेल्सिअस१९ एप्रिल २०२३: ४०.६ अंश सेल्सिअस१६ एप्रिल २०२४: ४०.५ अंश सेल्सिअस