औरंगाबाद : शहरातील विविध उड्डाणपुलांच्या खाली नशा करणारे, चौकाचौकात भिक्षा मागणाऱ्यांच्या विरोधात दामिनी पथकाने बुधवारी ‘स्पेशल ड्राईव्ह’ घेत नागरिकांची त्यांच्या तावडीतून सुटका केली. पुन्हा त्या ठिकाणी दिसून आल्यास गुन्हे दाखल करण्याचा इशाराही संबंधितांना देण्यात आला असल्याची माहिती दामिनी पथकाच्या उपनिरीक्षक सुवर्णा उमाप यांनी दिली.
शहरातील क्रांती चौक, बाबा पेट्रोल पंप, रेल्वे स्टेशन, सिडको बसस्थानक, सेवन हिल उड्डाणपूल, तीसगाव सिग्नल याठिकाणी भिक्षा मागणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. तसेच उड्डाणपुलांच्या खाली नशा करणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे निदर्शनास आल्यामुळे दामिनी पथकाच्या दोन्ही वाहनांतील कर्मचाऱ्यांनी बुधवारी ‘स्पेशल ड्राईव्ह’ घेतला. यात प्रत्येक भिक्षेकऱ्याची माहिती जमा करण्यात आली. तसेच त्यांच्या नावासह रहिवासाच्या ठिकाणाची माहिती जमा केल्यामुळे भीक मागणाऱ्या सर्वांची घरे औरंगाबादबाहेर असल्याचे स्पष्ट झाले. भीक मागणे हा त्यांचा व्यवसाय बनला असल्याचेही चौकशीतून समोर आले. या सर्वांना पुन्हा चौकात भीक मागताना आढळून आल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, लता जाधव, आशा गायकवाड, निर्मला निंभोरे, गिरीजा आंधळे आणि मनीषा बनसोडे यांच्या पथकाने केली.
भीक देऊ नकानागरिकांनी भीक मागत असलेल्या लहान मुलांना पैशाच्या स्वरूपात मदत देऊ नये, पैशाच्या स्वरूपात मदत दिल्यास ती मदत मुलांना भीक मागण्यास लावणाऱ्यांना मिळते. त्यातून मुलांना भीक मागण्यास भाग पाडणाऱ्यांचे रॅकेट अधिक बळकट होते. ते होऊ न देण्यासाठी नागरिकांनी भीक मागणाऱ्यांना पैसे देऊ नयेत, असे आवाहनही दामिनी पथकाने केले आहे.