छत्रपती संभाजीनगर : सोमवारी तापमान पाच अंशांपर्यंत कमी झाल्यानंतर मंगळवारी (दि.२८) मात्र पारा ४२ अंशांपर्यंत वर गेला. शिवाय पुढील पाच दिवस आणखी कडक उन्हाचे अर्थात हॉट राहणार असल्याचा अंदाज जिल्हा हवामान केंद्राने वर्तविला आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर आणि जिल्ह्याकरिता मे महिना प्रचंड उष्णतेचा राहिला. महिन्याचे शेवटचे तीन दिवस उरले आहेत. पारा ४३ अंशांच्या वर गेला होता. सोमवारी मात्र शहराचे तापमान ३७ अंशांपर्यंत खाली आले होते. मंगळवारी पुन्हा तापमान पाच अंशांनी वाढून ४२अंश नोंदवले गेले. नागरिकांनी दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे. तसेच महत्त्वाची कामे सकाळी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ४ वाजेनंतर करावी, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
कामानिमित्त घराबाहेर जावेच लागणार असेल तर डोक्याला रूमाल बांधावा अथवा टोपी घालावी. तसेच भरपूर पाणी प्यावे, सन गॉगल्सचा वापर करावा, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.