वाळूज महानगर : वळदगाव शिवारात शुक्रवारी बिबट्या दिसल्याने नागरिक भयभीत झाले. वन विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. ११) वळदगाव शिवारात भेट देऊन बिबट्याचा शोध घेतला. घटनास्थळी आढळलेले पंजाचे ठसे तपासणीसाठी घेतले.
वनपाल सतीश काळे, वनरक्षक आर.एच. मुळे, वन कर्मचारी तुपे, हजारे, बारगळ, हजारे आदींनी शनिवार (दि. ११) गावाला भेट दिली. सरपंच अमर डांगर, उपसरपंच संजय झळके, माजी सरपंच कैलास चुगंडे, राजेंद्र घोडके, ग्रामपंचायत सदस्य विष्णू झळके, बाबासाहेब झळके आदी वन विभागाच्या अधिकाऱ्यासोबत बिबट्या दिसलेल्या ठिकाणी गेले होते. वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी कपाशीच्या शेतातील प्राण्याच्या पावलाचे ठसे तपासणीसाठी घेतले. जूनमध्ये दोन कुत्र्यांचा तसेच १५ दिवसांपृूर्वी अमीर शेख यांच्या वासराचा बिबट्याने फडशा पाडल्याने नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना सांगून बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली.
शिकारीनंतर कॅमेरे लावणारबिबट्याने एखाद्या प्राण्याची शिकार केल्यानंतर तो रात्री पुन्हा तेथे मांस खाण्यासाठी येत असतो. या परिसरात एखाद्या प्राण्याची शिकार केल्यानंतर कॅमेरे लावण्याचा निर्णय घेणार असल्याचे वनपालक सतीश मुळे यांनी सांगितले. या परिसरात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी सोपे जाते. तसेच शिकारीसाठी कुत्रे, रानडकुरे सहज मिळत असल्याने बिबट्याचा या परिसरात वावर असण्याची शक्यता आहे. बिबट्या हल्ला करण्याची शक्यता असल्याने शेतकरी व नागरिकांनी लाठ्या-काठ्या घेऊन तसेच समूहाने बाहेर पडण्याचे आवाहनही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. शेतातील पशुधनही सुरक्षित ठिकाणी हलविण्याच्या सूचना वनपाल सतीश काळे व वनरक्षक आर.एच. मुळे यांनी केल्या. वळदगाव शिवारात शुक्रवारी सायंकाळी हरिभाऊ अण्णा शिंदे, आशाबाई तुकाराम माळी व बिजलाबाई कल्याण बर्डे यांना बिबट्या दिसला होता.