छत्रपती संभाजीनगर : लग्नात ऐवज लांबवणाऱ्या चोरांच्या टोळ्या यंदाही सक्रिय झाल्या आहेत. गेल्या ६ दिवसांत ३ मोठे लग्नसमारंभ, एका साखरपुड्यातून १४ तोळे सोने, ४ लाख रोख व ३ मोबाइल लंपास झाले. हे सर्व चोर सीसीटीव्ही घटनेत कैद झाले. वऱ्हाडींप्रमाणे वेशभूषा, नातेवाइकांसारखा वावर ठेवून सहज वधू-वराच्या जवळचे दागिने, रोख असलेल्या पर्स, पिशव्या लंपास करत आहेत.
तुळशीचे लग्न पार पडताच नोव्हेंबरअखेर सर्वत्र मोठ्या उत्साहात लग्नसमारंभास प्रारंभ होतो. मात्र या लग्नांवर आता चोऱ्यांचे सावट पडले आहे. पहिली घटना हर्सूलच्या मधुरा लॉनमध्ये घडली. २५ नोव्हेंबर रोजी विष्णू काकडे यांच्या मुलाच्या साखरपुड्यात चोराने त्यांच्या पत्नीची स्टेजवरून पर्स लंपास केली. मोठा ऐवज चोरांच्या हाती लागला नसला तरी २ मोबाइल, २ एटीएम कार्ड, महत्त्वाची कागदपत्रे होती. या घटनेनंतर शहरात सलग तीन लग्नसमारंभांत या टोळ्यांनी वऱ्हाडी बनून हात साफ केला. त्यामुळे लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगावर विरजण न पडू देण्याचे मोठे आव्हान वधू-वरांचे कुटुंबीय, लॉन, कार्यालय चालकांसह पोलिसांसमोर आहे.
दुसरी घटना : संगीता रासणे (रा. नाशिक) यांच्या भाचीचे २७ नोव्हेंबर रोजी सूर्या लॉन्स येथे लग्न होते. भाचीच्या दागिन्यांची पिशवी त्यांच्याकडेच होती. रात्री ९ वाजता सीमंतिनी पूजनादरम्यान आहेर देण्यासाठी त्यांनी स्टेजवर जवळच पर्स ठेवली. मात्र, काही क्षणात ती चोराने लंपास केली. काळे जॅकेट घातलेल्या तरुणाने ती लंपास केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. यात ४ तोळे सोने, १६० ग्रॅम चांदीचे दागिने व ३ हजार रोख रक्कम होती.
तिसरी घटना : दीपक कदमबांडे (रा. नंदुरबार) हे ३ डिसेंबर रोजी भाचा कुणाल शेळकेच्या लग्नासाठी हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे उपस्थित होते. कुणालला येत असलेल्या भेटवस्तू आई, भाची पिशवीत ठेवत होत्या. मात्र, भाची एका फोटोसाठी उभी राहिली व तिने खुर्चीवर ठेवलेली आहेराची पर्स चोराने लंपास केली. यात जवळपास ३ लाख ५० हजार रोख रक्कम होती.
चौथी घटना : सुनील जैस्वाल (रा. चिकलठाणा) हे नातेवाईक जगदीश जैस्वाल यांच्या मुलाच्या रिसेप्शनसाठी औरंगाबाद जिमखाना येथे ३ डिसेंबर रोजी कुटुंबासह हजर होते. रात्री साडेआठ वाजता त्यांच्या पत्नीने त्यांच्याजवळील खुर्चीत ठेवलेली मौल्यवान दागिन्यांची बॅग लंपास झाली. त्यात १० तोळे सोन्याचे दागिने, १ मोबाईल व ५ हजार रोख रक्कम होती.
एकाच वेळी अनेक लग्नात चोरीशहरात ४०० पेक्षा अधिक लॉन्स, हॉटेल, लग्न कार्यालय व मोकळ्या मैदानांवर हे समारंभ पार पडतात. चोरांना याचा पुरेपूर अभ्यास असतो. एकाच वेळी त्यांचे साथीदार वेगवेगळ्या लग्नात शिरकाव करतात.
८ वर्षांची परंपरा, लहान मुलांचा वापरशक्यतो मध्य प्रदेशातील एका गावातील लोक या चोऱ्या करतात. राजस्थानातून लहान मुले कंत्राटावर घेऊन त्यांना प्रशिक्षित करून लग्नसमारंभात चांगले कपडे परिधान करून पाठवतात. तेही चोरीत यशस्वी ठरतात. शहरातील २ प्रख्यात डॉक्टर व ३ बड्या उद्योजकांच्या लग्नातून कोट्यवधींचे दागिने गेले. मात्र, त्या गावात जाऊनही पोलिसांना दागिने परत मिळवण्यात यश आले नाही. स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वीरीत्या याच गावातून चोर पकडून दागिने परत आणले होते.