प्रशांत सोळुंके
चिंचोली लिंबाजी : कन्नड तालुक्यातील नेवपूर(खा) व नेवपूर(जहागीर) या गावांमध्ये अनेक नागरिकांच्या घरांमध्ये शौचालय आहेत. तरीही नागरिक मोठ्या संख्येने शौच करायला मोकळ्या वातावरणात जाणे पसंद करतात. अनेकांना शासकीय योजनेतून शौचालये मिळालेली आहेत. काहींचे बांधकाम अर्धवट आहे, तर काही शौचालये बांधण्यास टाळाटाळ करीत आहेत. यावर आता या दोन्ही गावच्या ग्रामपंचायतींनी कडक धोरण अवलंबिले असून बाहेर शौचास जाणारांवर आता सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. यामुळे उघड्यावर जाणारांची चांगलीच गोची होणार आहे.
नेवपूर (खा.) व नेवपूर (ज.) या दोन्ही गावांची वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही गावांमध्ये ना वेस आहे ना नदी. मात्र दोन ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत. या दोन्ही गावांतील बहुतांश नागरिक अद्यापही उघड्यावर शौचास जात असल्याने नवनियुक्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ही गावे हागणदारीमुक्त करण्याचा चंग बांधला आहे. नागरिकांना उघड्यावर जाण्यापासून रोखण्यासाठी दोन्ही गावातील नवनियुक्त ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी नागरिकांसोबत एकत्र बैठक घेत घेतली. यासाठी २५ जणांचे गुड मॉर्निग पथक स्थापन करून चार ते पाच जणांचा ग्रुप तयार करण्यात आला. अस्वछतेचे पॉईंट निश्चित करून त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पथकांसोबतच सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यही दररोज पहाटे पाच वाजेपासून ठिकठिकाणी उभे राहून उघड्यावर शौचास जाणारांना प्रतिबंध करतात. तसेच नागरिकांना रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. याला ग्रामस्थही प्रतिसाद देत असून उघड्यावर शौचास जाणे टाळत आहेत. यामुळे दोन्ही गावांची वाटचाल निर्मलग्राम गावाच्या दिशेने सुरू झाली आहे.
कोट
ज्या नागरिकांनी शासकीय अनुदान घेऊन शौचालय बांधले नाहीत किंवा अर्धवट आहेत. त्यांना बांधकामासाठी एक महिन्यांचा कालावधी दिला आहे. ज्या लोकांना अद्यापपर्यंत अनुदानाचा लाभ मिळाला नाही, त्यांना शौचालय बांधण्यासाठी ग्रामपंचायत आर्थिक मदत करणार आहे. यानंतरही जर नागरिक उघड्यावर जात असेल तर त्यांना दंड आकारण्यात येणार आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहे. यामुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकांवर नजर ठेवता येईल.
-सुनीता मनोज देशमुख, सरपंच, नेवपूर(खा.)
कोट
आपले गाव आपली जबाबदारी त्या अनुषंगाने आपण सर्वांनी आपली व आपल्या गावाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आपले गाव जर हागणदारीमुक्त झाले, तर आरोग्य समस्या उद्भवणार नाही. यासाठी सर्वांनी शौचालय बांधकाम करून त्याचा नियमित वापर करावा.
- आशाबाई शिवाजी आवारे, सरपंच, नेवपूर(जा.)
कोट
आम्ही गेल्या आठ दिवसांपासून शौचालय वापरासाठी नागरिकांची जनजागृती करीत आहोत. लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत गाव १०० टक्के हागणदारीमुक्त होईल.
- संगीता कोतकर, उपसरपंच, नेवपूर(खा.)
फोटो : नेवपूर येथे उघड्यावर शौचालयास जाणाऱ्या नागरिकांना प्रतिबंध करण्यासाठी गुड मॉर्निग पथकाचे सदस्य दररोज सकाळी उठून असा खडा पहारा देतात.