छत्रपती संभाजीनगर : शहरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. मात्र रुग्णवाढ सुरू झाल्यापासून कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. दरम्यान, रविवारी कोरोनामुळे शहरात एका ८७ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही महिला पीरबाजार येथील रहिवासी आहे. तर दुसरीकडे रविवारी सात नवीन रुग्णांची भर पडली.
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर संसर्ग पसरला होता. या लाटेत येथील रुग्णवाढीमुळे केंद्र व राज्य सरकारने देखील गंभीर दखल घेत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यावर भर दिला गेला. मात्र तिसऱ्या लाटेत कोरोना प्रतिबंधक लसीमुळे कोरोनाचा फारसा प्रभाव दिसून आला नाही. मात्र आता पुन्हा मार्चपासून कोरोनाच्या रुग्णांची संख्या देशभरात वाढू लागली आहे. छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातही वीस दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत चढउतार सुरू आहेत.
मागील महिन्यात दोन हजारावर अधिक चाचण्यांतून ९३ रुग्ण कोरोनाबाधित निघाले. रविवारी वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. या महिलेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. २० मार्च रोजी ती रुग्णालयात दाखल झाली होती. तर दुसरीकडे रविवारी ७ नवीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तर आधीच्या रुग्णांतील दोघे कोरोनामुक्त झाले. यामुळे शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या ४१ तर जिल्ह्यात ४७ असल्याचे अहवालात नमूद आहे. नागरिकांनी घराबाहेर गर्दीच्या ठिकाणी वावरताना काळजी घ्यावी, नियमांचे पालन करावे, मास्क वापरावा, सॅनिटायझर वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.