औरंगाबाद : छोट्या-मोठ्या आजारात दवाखान्यात न जाता वेदनाशामक औषधी घेतली जाते; मात्र असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. कारण डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधी मूत्रपिंड अर्थात किडनीचे काम बिघडवितात. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधी घेतली पाहिजे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
किडनी शरीराचा महत्त्वाचा भाग असतो. शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर फेकण्याचे महत्त्वाचे काम किडनी करते, परंतु काही चुकीच्या सवयींमुळे किडनीचे नुकसान होऊ शकते. काही रुग्णांना वेदनाशामक (पेन किलर) सेवन करण्याची सवय अधिक असल्याचे दिसते. अनेकदा हृदयरोगाचा त्रास असणारेही ‘पेन किलर’ घेताना दिसतात, परंतु अधिक प्रमाणात ‘पेन किलर’चा वापर केल्यास किडनी निकामी होण्याची शक्यता असते. काही ‘स्ट्राँग पेन किलर्स’मुळे रक्तदाबही वाढू शकतो किंवा कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधी घेणे टाळाडाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधी घेणे टाळले पाहिजे. ज्या व्यक्ती डॉक्टरांच्या सल्ल्याने ‘पेन किलर’चे सेवन करत असतील त्यांनी डॉक्टरांकडून या त्यांच्या दुष्परिणामांची माहितीसुद्धा घेतली पाहिजे.
किडनी विकार वाढण्याची कारणेकिडनी विकाराची कारणे व प्रकार अनेक आहेत. या सर्वांत लघवीचे प्रमाण कमी होते. रक्तदाब वाढतो. शरीरात पाणी व क्षारांचे प्रमाण वाढल्याने सर्वत्र सूज येते. मधुमेह, उच्च रक्तदाब, मूत्रपिंडांना संसर्ग आदी कारणांमुळे मूत्रपिंडाच्या कामावर परिणाम होऊ शकतो.
किडनी विकाराची लक्षणे काय?शरीरात विषारी घटक आणि कचरा जमा झाल्यामुळे भूक कमी होऊ शकते. हे किडनी निकामी होण्याचे खतरनाक लक्षण आहे. जेव्हा किडनी योग्यरित्या काम करणे थांबवते तेव्हा शरीरात सोडियमचे प्रमाण वाढते. ज्यामुळे पोटऱ्या आणि घोट्याला सूज येते. त्वचेमध्ये कोरडेपणा आणि खाज येणे हे देखील किडनी विकाराचे मुख्य लक्षण आहे. वारंवार लघवी होणे हे किडनी निकामी होण्याचे लक्षण आहे.
बालकांमध्येही किडनीचे विकारलहान मुलांना मूत्रपिंड विकार कसा होईल असे आपल्याला वाटते, पण बालकांमध्येही तो होऊ शकतो. त्याची कारणे आनुवंशिक किंवा जन्मजात असतात. जंतूसंसर्गामुळेही या आजाराची शक्यता निर्माण होऊ शकते.
डाॅक्टरांचा सल्ल्याशिवाय औषधी नकोडाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय ‘पेन किलर’ घेता कामा नये. सतत ‘पेन किलर’ घेतल्याने त्याचा परिणाम किडनीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकदा ‘पेन किलर’ घेतल्यानंतरही किडनीवर परिणाम झाल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे डाॅक्टरांच्या सल्ल्याने औषधी घेतली पाहिजे.- डाॅ. सचिन सोनी, मूत्रपिंड प्रत्यारोपणतज्ज्ञ