छत्रपती संभाजीनगर : अलीकडे उन्हाचा पारा सतत वर सरकत आहे. उन्हाच्या काहिलीने जनावरेही अस्वस्थ होत आहेत. वाढत्या तापमानामुळे केवळ मनुष्यांना उष्माघाताचा धोका आहे असे नव्हे, तर जनावरांनाही उष्माघाताचा फटका बसू शकतो. त्यामुळे उन्हापासून जनावरांचे संरक्षण करावे, असे आवाहन जि. प. पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
जिल्ह्यात लहान-मोठे मिळून साडेपाच लाखांहून अधिक जनावरे आहेत. उन्हाच्या झळांनी पशुधनालाही धोका निर्माण होतो. त्यामुळे पशुपालकांनी काळजी घ्यावी. वाढत्या उष्म्याने त्यांचे शारीरिक तापमान (१०३ ते ११० अंश फॅरानहाइट) वाढते. त्यांची तापमान नियंत्रण करण्याची क्षमता कमी पडल्यास शारीरिक तापमानात वाढ होते. त्यामुळे एका जागी उभे राहणे, बैचेन होणे, सतत उठ-बस करणे, भूक मंदावणे, रोगप्रतिकारशक्ती कमी होणे. लहान-मोठ्या आजारांना बळी पडणे आणि दूध उत्पादनात मोठी घट होणे, अशी जनावरांमध्ये लक्षणे दिसून येतात.
गेल्या काही दिवसांपासून तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. त्यामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी पशुपालकांनी काळजी घेतली पाहिजे. जनावरांना ऐन दुपारच्या वेळेत मोकळे सोडणे किंवा त्यांना बांधलेल्या ठिकाणी उन्हाचा त्रास जाणवणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यांना सावलीत किंवा मोकळ्या हवेशीर जागेत बांधावे. उष्माघाताचा त्रास जाणवल्यास तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुरेखा माने यांनी केले आहे.
पिण्यासाठी २४ तास पाणी द्यासकाळी १० ते दुपारी ५ वाजेपर्यंत शक्यतो जनावरांना चरण्यासाठीही बाहेर सोडू नये. त्यांना थंड सावली असलेल्या ठिकाणीच बांधावे, त्यांच्या अंगावरती किमान दिवसातून दोन ते तीन वेळा पाणी टाकावे. तसेच त्यांना पिण्यासाठी २४ तास जास्त प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे, जेणे करून ते आपल्या शरीरातील तापमान संतुलित ठेवू शकतील. बैलांकडून शेतीच्या मशागतीची कामे शक्यतो सकाळी व संध्याकाळी कमी उन्हात करून घ्यावीत.- डॉ. सुरेखा माने, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद